रायगडच्या सुपुत्राने शास्त्रीय गायनातून देशभरात गाजवले कर्तृत्व; देशभर शास्त्रीय संगीतातील प्रचार आणि प्रसारास हातभार
पनवेल (प्रतिनिधी) रायगड जिल्ह्याचे सुपुत्र आणि प्रख्यात शास्त्रीय गायक पं. उमेश निवृत्तीबुवा चौधरी यांनी आपल्या सुरेल, सर्जनशील आणि शास्त्रशुद्ध गायकीच्या माध्यमातून देशभरातील श्रोत्यांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले आहे. गेल्या चार दिवसांत त्यांनी सलग चार राज्यस्तरीय शास्त्रीय संगीत महोत्सवांमध्ये सहभाग घेत, महाराष्ट्राबाहेर कर्नाटक, बेळगाव, हैद्राबाद आणि बंगलोर येथे आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
रायगड जिल्हा संस्कृतीनिष्ठ भूमीतील कलाकार पं. उमेश निवृत्तीबुवा चौधरी यांनी आपल्या सर्जनशील गायनाने संपूर्ण देशभरात शास्त्रीय संगीतातील अध्वर्यू म्हणून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांचे गायन हे केवळ कलात्मक सादरीकरणापुरते मर्यादित न राहता, शास्त्रीय संगीतातील मूलतत्त्वांचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्यही ते प्रभावीपणे करत आहेत. त्याच अनुषंगाने त्यांनी वाटचाल करताना चार दिवसात महाराष्ट्र राज्याबाहेर विविध ठिकाणी सलग चार शास्त्रीय गायनाच्या महोत्सवात गायन करत परराज्यातीलही रसिकांची मने जिंकली. कर्नाटक, बेळगाव, हैद्राबाद, बँगलोर येथे झालेल्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात त्यांनी आपल्या ओजस्वी आणि भावपूर्ण गायनातून विविध रागांतील तंत्र, बंदिशी, आणि विशिष्ट घराण्याची गायकी सादर करत त्यांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या सादरीकरणास संगीतप्रेमी, विद्वान आणि अभ्यासकांकडून विशेष दाद मिळाली. पं. उमेश चौधरी हे गेल्या ३० वर्षांपासून संगीत क्षेत्रात सक्रिय असून, त्यांनी देशातील अनेक प्रतिष्ठित मंचांवर शास्त्रीय संगीताचे सादरीकरण केले आहे. शिवाय, तरुण पिढीमध्ये संगीताबद्दल जागरूकता निर्माण व्हावी म्हणून ते सातत्याने कार्यरत आहेत.शास्त्रीय संगीत हे भारताचे सांस्कृतिक वैभव असून, ते नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य पं. उमेश चौधरी यांनी आपल्या समर्पित सेवेतून साधले आहे. रायगडच्या मातीतून जन्मलेला हा कलाकार पिढीसाठी प्रेरणास्थान बनला आहे.
कर्नाटक मधील मुडलगी येथे शिवरुद्र स्वामी मठ, बेळगाव येथील बी. आर. कडाळस्कर ट्रस्ट तर्फे केकणवाडी आयुर्वेदिक कॉलेज ऑडिटोरियम, हैद्राबाद येथे मॅस्ट्रो म्युझिक अकॅडमीवतीने, आणि बंगलोर येथे धून म्युझिक अकॅडमीच्यावतीने गायन महोत्सव आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्र ते कर्नाटक, बेळगाव, हैद्राबाद, बंगलोर असा दूरवरचा प्रवास करत त्यांनी चार दिवसात चार महोत्सवात आपले शास्त्रशुद्ध शास्त्रीय गायन सादर केले. लांबचा प्रवास आणि त्यातून वातावरण बदल असला कि आवाजातही बदल होण्याची भीती असते मात्र पं. उमेश चौधरी यांनी आपल्या शैलीत तिळमात्र बदल केला नाही उलट त्यात अधिक आत्मीयता आणि गहिवर अनुभवायला मिळाला. त्यांच्या गायनाने वातावरण प्रफुल्लित आणि भारावून गेले होते. चार सलग कार्यक्रमांमधून त्यांनी केवळ संगीत सादर केले नाही, तर शास्त्रीय संगीताचा प्रसार करत भारतीय सांस्कृतिक वारशाची ज्योत प्रज्वलित ठेवली आहे. यानिमिताने शिवरुद्र स्वामी मठाचे श्रीधर स्वामी यांनी त्यांना आशीर्वाद दिले तसेच पुढील वर्षीही कार्यक्रमाला येण्याचे आमंत्रित केले. त्याचबरोबरीने संगीत क्षेत्रातील दिग्गज असलेले गुरुराज कुलकर्णी, प्रसाद पंडित, वंदना कट्टी, संजय देशपांडे, श्रीधर कुलकर्णी यांसारख्या अनेक मान्यवरांनी पं. उमेश चौधरी यांच्या गायनशैलीचे कौतुक केले. यावेळी झालेल्या गायनासाठी पं. उमेश चौधरी यांना तबल्याबर पं. विनायक नाईक, विजय रेड्डी, पं. निषाद पवार, सूरज गोंधळी यांनी हार्मोनियमवर पं. सुधांशु कुलकर्णी, मंदार दीक्षित, योगेश रामदास, सुर्या उपाध्याय, यादवेंद्र पुजारी यांची संगीत साथ लाभली.