राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त खांदा कॉलनी येथे महिला मेळावा
पनवेल (प्रतिनिधी) चारित्र्यसंपन्न समाज निर्मितीसाठी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना समजून घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश प्रभारी अध्यक्षा वर्षाताई भोसले यांनी खांदा कॉलनी येथे आयोजित महिला मेळाव्यात केले. अखंड परिश्रम, जनसेवेचा वसा आणि न्यायप्रियतेचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने हा विशेष महिला मेळावा आणि भव्य रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. खांदा कॉलनीमधील श्री कृपा हॉल येथे गुरुवारी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या मेळाव्याला प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस दीपक बेहरे, चारुशीला घरत, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील, पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्या रत्नप्रभा घरत, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, महिला मोर्चा सरचिटणीस वृषाली वाघमारे, उपाध्यक्षा प्रिया मुकादम, संध्या शारबिद्रे, माजी नगरसेविका दर्शना भोईर, प्रमिला पाटील, राजश्री वावेकर, प्रिती जॉर्ज, पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमीत झुंझारराव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची यंदा ३०० वी जयंती साजरी केली जात आहे. या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या वतीने २१ ते ३१ मे या कालावधीत 'सामाजिक पर्व' म्हणून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच अंतर्गत खांदा कॉलनी येथे आयोजित महिला मेळावा आणि रांगोळी स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, गेल्या दहा दिवसांपासून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींचे कर्तृत्व समाजासमोर वेगवेगळ्या माध्यमातून येत आहे आणि महाराणींचे चारित्र्य समजून घेण्याचा योग आपल्याला आला आहे. त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाची आणि कार्याची माहिती घेतल्यानंतर ती समाजासमोर नेण्याचे काम आपण सर्वानी केले पाहिजे, असे आवाहन केले.
या कार्यक्रमादरम्यान रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. यात हर्षदा फगरे यांनी प्रथम, तनिषा भोईर यांनी द्वितीय तर अंजली खौंड यांनी तृतीय क्रमांक पटकावला. सर्व विजेत्यांना तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.