जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ‘मासिका महोत्सव’ संपन्न
नवी मुंबई:(प्रतिनिधी)-जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर 28 मे रोजीच्या जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग व आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून शेल्टर असोसिएशन यांच्या सहयोगाने महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात नमुंमपातील महिला अधिकारी, कर्मचारी यांच्याकरिता मासिका महोत्सव संपन्न झाला. ‘मौन सोडा, जनजागृती वाढवा आणि महिलांना सक्षम करा’ - या त्रिसूत्रीच्या आधारावर आयोजित या महत्वाच्या कार्यक्रमात तज्ज्ञ मार्गदर्शकांनी मासिक पाळीमध्ये वापरावयाची आधुनिक उपकरणे व घ्यावयाची काळजी याबाबत संवाद साधत जागरुकता निर्माण केली. जगभरात या मासिका महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर वैदयकिय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे, महापालिका सचिव श्रीम.चित्रा बाविस्कर, शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीम.संघरत्ना खिल्लारे, क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या उपआयुक्त श्रीम. अभिलाषा म्हात्रे, उदयान विभागाच्या उपआयुक्त नयना ससाणे तसेच कार्यक्रमाच्या व्याख्यात्या विवा वेदांत फाऊंडेशनच्या डॉ.संगीता बनसोडे व श्रृंखला फाऊंडेशनच्या श्रीम. मगेश्वरी तसेच शेल्टर असोसिएट्सच्या सह.कार्यकारी संचालक श्रीम. धनश्री गुरव व प्रकल्प व्यवस्थापक डॉ. निलिमा गावडे तसेच संस्थेच प्रकल्प समन्वयक श्री.अमोल गाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे यांनी स्त्रियांचे आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले व मासिक पाळीच्या काळात घ्यावयाची काळजी याबाबत माहिती दिली.
महापालिका सचिव श्रीम.चित्रा बाविस्कर यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून या महत्वपूर्ण विषयावर आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच मासिक पाळीविषयी पूर्वीचे समज, गैरसमज तसेच त्यामागची पार्श्वभूमी याबद्दल माहिती दिली.
व्याख्यात्या डॉ. संगीता बनसोडे यांनी मासिक पाळीमध्ये होणा-या सॅनिटरी पॅडच्या अयोग्य वापरामुळे महिलांमध्ये अनेक संसर्ग / आजार होतात तसेच वापरलेल्या सॅनिटरी पॅडची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावली जात नाही त्यामुळे मोठया प्रमाणात घातक कचऱ्याची निर्मिती होऊन पर्यावरणाची हानी होते. तसेच हा कचरा वर्षानुवर्षे पृथ्वीवर तसाच राहतो यातून अनेक समस्या निर्माण होतात याविषयी माहिती देत महिलांनी वैयक्तिक आरोग्याची काळजी घेणे तसेच पर्यावरण संरक्षणाकरीता मेनस्ट्रयुअल कपचा वापर करणे आवश्यक आहे याबाबत महत्वपूर्ण असे मार्गदर्शन केले. श्रृंखला फाऊंडेशनच्या श्रीम. मगेश्वरी यांनी मेनस्ट्रयुअल कपचा वापर कसा करायचा याबाबत शास्त्रोक्त माहिती दिली.
शेल्टर असोसिएट्सच्या माध्यमातून नवी मुंबईत झोपडपट्टी भागातील महिलांकरिता मासिक पाळीतील स्वच्छता या विषयावर जनजागृतीपर उपक्रमांचे सातत्यपूर्ण आयोजन केले जाते. त्यातील महिलांचे विविध अनुभव या कार्यक्रमाप्रसंगी व्हिडिओ ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून दाखवण्यात आले. झोपडपट्टी भागातील 500 हून अधिक महिला या कपचा वापर करत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली व यापुढील काळात याबाबत अधिक जागरुकता निर्माण करण्याचे काम संस्थेमार्फत करण्यात येईल असेही सांगण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित नमुंमपा महिला अधिकारी, कर्मचारी यांच्या मनातील मासिक पाळी काळातील घ्यावयाची काळजी याबाबतच्या शंकांना तज्ज्ञ मार्गदर्शकांनी समाधानकारक उत्तरे दिली. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या जास्तीत जास्त महिला कर्मचारीवर्गाने मेनस्ट्रयुअल कपचा वापर करावा व आपल्या आरोग्याबाबत जागरुक राहावे आणि पर्यावरणाची हानी टाळावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.