यशदा पुणे येथील राज्यस्तरीय कार्यशाळेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वॉटर प्लस मानांकनाविषयी सादरीकरणाचा मान

 यशदा पुणे येथील राज्यस्तरीय कार्यशाळेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वॉटर प्लस मानांकनाविषयी सादरीकरणाचा मान


 

 

 

            महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागामार्फत, मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत, यशदा पुणे येथे ‘महानगरपालिका आयुक्त व नगरपरिषद मुख्याधिकारी यांची निवासी कार्यशाळा’ संपन्न झाली.

            यामध्ये नागरी संस्थांमधील सर्वोत्कृष्ट पध्दतींच्या सादरीकरणांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या ‘वॉटर प्लस’ मानांकनाबाबत सादरीकरणाचा बहुमान नवी मुंबई महानगरपालिकेस मिळाला. महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी ‘वॉटर प्लस - कार्यक्षम आणि शाश्वत सांडपाणी प्रक्रिया व पुनर्वापर’ या विषयाच्या अनुषंगाने अभ्यासपूर्ण सादरीकरण करीत या गोष्टीतील नवी मुंबईची वैशिष्ट्यपूर्णता स्पष्ट केली.

            यामध्ये - सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची उपलब्धता व त्याचे व्यवस्थापन, घरगुती शौचालयांसाठी प्राधान्य, आकांक्षी शौचालयांची थ्री आर अंतर्गत उभारणी, पाणीपुरवठा व्यवस्थापन व स्काडा प्रणालीचा प्रभावी वापर, 24 x 7 पाणीपुरवठा नियोजन, मलनि:स्सारण व्यवस्थापन, मलप्रक्रिया केंद्रे व टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्ट, स्काडा प्रणाली, प्रक्रियाकृत पाण्याचा पुनर्वापर, स्वच्छ जलाशय व नाले व्यवस्थापन, सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज, त्यामध्ये यांत्रिकीकरण, सफाईमित्रांसाठी कल्याणकारी योजना – अशा विविध बाबींची सविस्तर माहिती देत आयुक्तांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे या क्षेत्रातील कार्य विशद केले.