महाराष्ट्र राज्य स्थापना दिनी नवी मुंबई महापालिका मुख्यालयात आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन
स्वच्छतामित्र व स्वच्छतासखींचा कामगार दिनानिमित्त सन्मान
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिवसानिमित्त महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन संपन्न झाले. यावेळी राष्ट्रध्वजाला वंदन करीत राष्ट्रगीत आणि तद्नंतर 19 फेब्रुवारी 2023 पासून महाराष्ट्र शासनाने अंगीकृत केलेले महाराष्ट्राचे राज्यगीत ध्वनीप्रसारित करण्यात आले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. शरद पवार, शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड आणि इतर विभागप्रमुख उपस्थित होते. तसेच सर्व अधिकारी - कर्मचारीवृंद, अग्निशमन दलाचे जवान, अतिक्रमण विभागाचे पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य स्थापनेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणा-या हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करीत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी महाराष्ट्र दिनासोबतच जागतिक कामगार दिनही असल्याने सर्व कामगारांना शुभेच्छा दिल्या. कामगारांप्रती बांधिलकी जपत नवी मुंबई महानगरपालिका त्यांच्या सुरक्षिततेचीही काळजी घेत असून सुरक्षित स्वच्छता अभियान राबविण्यावर भर दिला जात असल्याचे आयुक्तांनी सांगितले. कामगार दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेतील विविध विभागांत उत्तम काम करणा-या कामगारांना सन्मानीत केले जाते. त्यास अनुसरून नवी मुंबई शहराचे स्वच्छतेमधील मानांकन सतत उंचावत ठेवणा-या 12 स्वच्छताकर्मींचा आयुक्त महोदयांच्या शुभहस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या नावलौकिकात भर घालणा-या कामगारांच्या योगदानाचा सन्मान करणे हे कामगार दिनाच्या निमित्ताने औचित्यपूर्ण असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले. श्री.मनोहर पवार, श्रीम.पुजा पोरजी, श्री.रोहन म्हात्रे, श्री.निलेश सोनवणे, श्री.सागर सोनवणे, श्रीम.नमिता भिवे, श्री.अनिल कांबळे, श्री.संजय पाटील, श्रीम.विमल अहिरे, श्री.विशाल शिर्के, श्रीम.सरस्वती कानाले, श्री.बंटी राठोड या स्वच्छतामित्र व स्वच्छतासखींना याप्रसंगी सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आयकॉनिक वास्तू म्हणून ओळखल्या जाणा-या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालय इमारतीस 30 एप्रिल ते 2 मे 2025 या कालावधीत विद्युत रोषणाई करण्यात आली असून मुख्यालय इमारतीसमोर हुतात्मा चौकाची प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे. ती बघण्यासाठी व विद्युत रोषणाई आणि प्रतिकृतीसमवेत सेल्फी काढण्यासाठी नागरिक या परिसराला मोठ्या संख्येने भेट देत आहेत.