रविवार, 18 मे रोजी ई-कचरा संकलन उपक्रमात सहभागी होण्याचे नवी मुंबईकर नागरिकांना आवाहन

 रविवार, 18 मे रोजी ई-कचरा संकलन उपक्रमात सहभागी होण्याचे नवी मुंबईकर नागरिकांना आवाहन




 

*नोंदणी केल्यास ई-कचरा संकलनासाठी घरापर्यंत येणार गाडी*

 

 

            घनकचरा व्यवस्थापनामध्ये नागरिकांनी कच-याचे निर्मितीच्या ठिकाणीच वर्गीकरण करून महानगरपालिकेकडे प्रक्रियेसाठी द्यावे याबाबत नवी मुंबई महानगरपालिका आग्रही असून त्यादृष्टीने व्यापक जनजागृती करून कार्यवाही करण्यात येत आहे. या अनुषंगाने ई-कचरा अर्थात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा कचरा वेगळा संकलित करण्याकडेही महापालिका आयुक्ता डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष लक्ष देण्यात येत आहे.

            ई-कचरा संकलनासाठी महानगरपालिकेमार्फत वेगळे वेळापत्रक बनविण्यात आले असून रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी नवी मुंबई आणि थ्रेको कंपनी यांच्या सहकार्याने, ई-वेस्ट रिसायकलींग मोहीम हा अभिनव उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. बहुतांशी नवी मुंबईकर नागरिकांनाही दर महिन्याच्या तिस-या रविवारी ई-कचरा संकलित करण्यात येतो याची माहिती झाली असून आपल्या घराजवळून ई-कचरा संकलित केल्या जाणा-या या उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

            प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या रविवारी ही ई-वेस्ट संकलन मोहीम व्यापक स्वरूपात राबविली जात असून याचा लाभ वैयक्तिक पातळीवर नागरिक. गृहनिर्माण संस्था आणि औद्योगिक व इतर संस्था यांच्याकडून घेतला जात आहे.

            ई-वेस्ट संकलनासाठी महानगरपालिकेच्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरून जारी करण्यात आलेल्या क्यू आर कोडव्दारे अथवा

https://docs.google.com/forms/d/1-qBd5HS-OA5Bp4413z6H-R2X0_bccQyVGP87c1Tyz4k/edit?chromeless=1 या गुगल लिंकमधील फॉर्मवर आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व आपल्याकडील ई-कच-याची माहिती नोदविल्यास आपल्याकडील ई-वेस्ट (इलेक्ट्रॉनिक कचरा) गोळा करण्यासाठी आपण दिलेल्या पत्त्यावर अगदी दरवाजापर्यंत वाहन येऊन ई-वेस्ट संकलित केले जाते.

            इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची सुरक्षित आणि जबाबदारीने विल्हेवाट लावणे व त्याचे व्यवस्थापन करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून रविवार, दि. 18 मे 2025 रोजी ही ई-वेस्ट संकलन मोहीम राबविण्यात येत आहे.

            या मोहिमेद्वारे नवी मुंबईकर नागरिकांना मोबाइल, संगणक, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, चार्जर, बॅटऱ्या यांसारख्या वापरात नसलेल्या व टाकून दिलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू पर्यावरणशील पध्दतीने पुनर्प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेकडे देण्याची संधी मिळत असून या माध्यमातून पर्यावरणस्नेही योगदान देण्याची एक चांगली संधी मिळत आहे.

            तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील स्वच्छता व पर्यावरणप्रेमी जबाबदार, सोसायट्या, विविध संस्था, औद्योगिक संस्था व संघटना यांनी या पर्यावरणपूरक मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा आणि नवी मुंबईच्या स्वच्छता व पर्यावरणशीलतेसाठी अमूल्य योगदान द्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.