भारतरत्न श्री. सचिन तेंडुलकर यांच्या उपस्थितीत ॲकेडमीमार्फत नमुंमपा विद्यार्थ्यांना क्रिकेट प्रशिक्षणाचा शुभारंभ
मुलांमधील अंगभूत कौशल्ये ओळखून त्यांना योग्य वयात संधी उपलब्ध करुन देण्याची भूमिका जपत असून मुलांच्या आयुष्यात प्रकाश पेरण्याचे काम करीत असल्याबद्दल महानगरपालिका, शिक्षक व पालकांची प्रशंसा करीत जगप्रसिध्द क्रिकेटपटू भारतरत्न श्री. सचिन तेंडुलकर यांनी या माध्यमातून दर्जेदार खेळाडू घडतील असा विश्वास व्यक्त केला.
डॉ. डि वाय पाटील स्टेडिअम येथे असलेल्या सचिन तेंडुलकर क्रिकेट अॅकेडमीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना शास्त्रशुध्द क्रिकेट प्रशिक्षण मिळावे यादृष्टीने ॲकेडमीच्या पुढाकाराने देण्यात येत असलेल्या क्रिकेट प्रशिक्षणाच्या यावर्षीच्या शुभारंभप्रसंगी श्री. सचिन तेंडुलकर यांनी उपस्थित शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे, डॉ. डि वाय पाटील स्टेडिअमचे अध्यक्ष श्री. विजय पाटील उपस्थित होते.
यावेळी सुसंवाद साधतांना श्री. सचिन तेंडुलकर यांनी लहानपणीच्या क्रिकेट खेळाच्या आठवणी सांगतांना माझ्या भावाने क्रिकेट खेळण्याचे माझ्यातील कौशल्य हेरुन मला आचरेकर सरांकडे प्रशिक्षणासाठी पाठविले असे सांगत आपल्यातील कौशल्ये ओळखणारा व त्यासाठी योग्य संधी उपलब्ध करुन देणारा आपुलकीचा व्यक्ती जीवनात गरजेचा असतो असे सांगितले. ही संधी महानगरपालिकेच्या मुलांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी जो पाठिंबा आपण देत आहात तो महत्वाचा असल्याचे सांगत श्री सचिन तेडुलकर यांनी यश मिळाल्यानंतर ज्याप्रमाणे मुलांच्या पाठीशी उभे राहता त्याप्रमाणेच अपयशाच्या काळातही खंबीरपणे सोबत रहा असे मत व्यक्त केले.
खेळातला प्रवास हा दोन प्रकारे सुरु होतो. मेंदूपासून सुरु होणारा प्रवास हा भौतिक गोष्टींकडे ओढत असतो मात्र हृदयातून सुरु होणारा प्रवास हा खरा प्रवास असतो. या प्रवासात कितीही अडथळे आले तरी त्यातून आपण मार्ग काढतो व हा प्रवास उत्साह वाढवतो व अंतिम यश देतो असेही ते म्हणाले. यश ही प्रवासातली पुढची गोष्ट आहे, त्याआधी प्रवास सुरु करणे महत्वाचेअसल्याचे सांगत त्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेऊन मुलांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यास संमती दर्शविल्याबद्दल श्री. सचिन तेंडुलकर यांनी महानगरपालिकेचे अभिनंदन केले.
नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी अशा प्रकारची शास्त्रशुध्द क्रिकेट प्रशिक्षणाची मोठी संधी महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना ॲकेडमीच्या वतीने विनामूल्य उपलब्ध करुन देत असल्याबद्दल भारतरत्न श्री. सचिन तेंडुलकर यांचे आभार व्यक्त करीत ते जपत असलेल्या सामाजिक बांधिलकीबद्दल गौरवोद्गार काढले. प्रत्येकामध्ये वेगवेगळी कौशल्य असतात, प्रत्येकाची आत्मसात करण्याची क्षमता वेगवेगळी असते, मात्र सातत्यपूर्ण प्रयत्नातून सर्व शक्य आहे. त्यामुळे सचिनजींमुळे उपलब्ध होणा-या प्रशिक्षण संधीचा जास्तीत जास्त उपयोग करुन घ्यावा असे आवाहन आयुक्तांनी केले. नवी मुंबई महानगरपालिका स्थानिक पातळीवर विविध विभागांमध्ये वेगवेगळया खेळांकरिता मैदाने व इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यापुढील काळात नवी मुंबईतून क्रिकेट प्रमाणेच विविध खेळांमधील गुणवंत खेळाडू घडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सचिन तेंडुलकर क्रिकेट ॲकेडमीचे मुख्य प्रशिक्षक श्री. अतुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ॲकेडमीच्या निवड समितीने तीन दिवसांचे शिबीर राबवून महानगरपालिकेच्या शाळांतील 1100 हून अधिक विद्यार्थ्यांच्या क्रिकेट खेळाची चाचणी घेत त्यामधून 240 मुलांची अंतिम चाचणीसाठी निवड केली. डॉ. डि वाय पाटील स्टेडिअम येथे त्या मुलांचा काही वेळ खेळ बघत श्री. सचिन तेंडुलकर यांनी मुलांशीही संवाद साधला त्यामधील 20 मुले व 20 मुली यांची निवड करण्यात येऊन त्यांना वर्षभर विनामूल्य क्रिकेट प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या मुलांना क्रिकेट किटही ॲकेडमीमार्फतच देण्यात येणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांकडून प्रशिक्षण शुल्क घेतले जाणार नाही.
यापूर्वी सन 2022 पासून निवड चाचणी मधून निवड झालेल्या 20 मुलांपैकी 13 मुले व 9 मुलींपैकी 3 मुली ॲकडमीमध्ये नियमीत प्रशिक्षणासाठी जात आहेत. ही सर्व मुले आता वरील वयोगटात गेलेली असल्याने या वर्षी पुन्हा 15 वर्षाआतील मुलामुलींची निवड चाचणी घेऊन त्यामधून 20 मुले व 20 मुलींची निवड करण्यात येत आहे. यावेळी क्रीडा विभागाच्या उपआयुक्त श्रीम. अभिलाषा म्हात्रे पाटील, क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव व शिक्षणाधिकारी श्रीम. अरुणा यादव उपस्थित होते.
अशाप्रकारे नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी श्री. सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या जगप्रसिध्द खेळाडूच्या माध्यमातून शास्त्रोक्त क्रिकेट प्रशिक्षण उपलब्ध होणे ही दूर्मीळ संधी असून त्याबद्दल त्यांचे व डॉ. डि वाय पाटील स्टेडीयमचे अध्यक्ष श्री. विजय पाटील यांचे आभार व्यक्त करीत या सुविधेचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थी घेतील व यातून नवी मुंबईच्या नावलौकिकात भर घालणारे गुणवंत खेळाडू निर्माण होतील असा विश्वास आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी व्यक्त केला.