खारघर शहरातील पाणीटंचाई बाबत मा.नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांचा सिडकोला आंदोलनाचा इशारा

खारघर शहरातील पाणीटंचाई बाबत मा.नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांचा सिडकोला आंदोलनाचा इशारा 

खारघर/प्रतिनिधी दि.१२

खारघर शहरातील बहुतांश सेक्टरमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. जवळपास सर्वच सेक्टरमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आज सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांची भाजपा नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी विविध सेक्टर मधील नागरिकांसह भेट घेतली व त्यांना खारघर शहरातील होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठा बाबत तसेच तीव्र पाणीटंचाई बाबत कल्पना दिली.उन्हाळ्याची सुरुवात झालेली असून मागील अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.खारघर शहरातील सेक्टर ११,१३,१९,२० व २१ तसेच खारघर व मुरबी गाव या ठीकाणी पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे. वेळोवेळी सिडकोला अनेक सोसायट्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु सिडको प्रशासनाकडून कुठलीही ठोस उपाययोजना आतापर्यंत करण्यात आली नसल्यामुळे सोसायटीतील नागरिक त्रस्त झाले आहेत. सेक्टर 19 तसेच सेक्टर 21 या दोन्ही सेक्टर मधील काही सोसायट्यांना पाणीपुरवठा हा नेहमीच म्हणजे वर्षभर कमी दाबाने होत असतो. याबाबतीत कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग सिडको यांना कल्पना देऊन देखील कुठलीही उपाययोजना करण्यात आली नसल्याचे सदर सोसायटीतील नागरिकांची तक्रार आहे. नुकताच मार्च महिना सुरू झाला आहे मागील आठवड्याभरापासून काही ना काही कारणाने सिडकोचे पाणी एक तर कमी दाबाने येत आहे किंवा येतच नाही त्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. संपूर्ण उन्हाळा अजून जायचा आहे व आत्तापासूनच नागरिकांना प्रायव्हेट पाण्याचे टँकर मागवावे लागत आहेत व त्याचा आर्थिक भार त्यांना सहन होण्यासारखा नाही. रहिवाशी असा देखील आरोप करत आहेत की सिडको फक्त घरांचे निर्माण करत आहेत त्यासाठी लागणारे पाणी कुठून आणणार असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे.असेही या तक्रारीत म्हटले आहे.

याबाबतीत लवकरात लवकर योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी सर्व रहिवाशांच्या वतीने सिडको प्रशासनाला विनंती करण्यात आली. श्री गणेश देशमुख सह व्यवस्थापकीय संचालक सिडको यांनी नागरिकांना आश्वासित केले की लवकरच बाळगंगा धरणाचा महत्त्वपूर्ण टप्पा पार पडल्यानंतर सर्वांनाच मुबलक प्रमाणात पाणी मिळेल. तसेच न्हावा सेवा टप्पा ३ ची पाईपलाईन देखील लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सिडको प्रशासन प्रयत्न करत आहे. रहिवाशांनी सिडको व्यवस्थापनाला त्यांच्या रोजच्या होणाऱ्या त्रासातून मुक्तता व्हावी अशी विनंती केली. भाजपा खारघर मंडल उपाध्यक्ष किरण पाटील यांनी सिडको प्रशासनाला सांगितले की आपण पाण्याचा प्रश्न गंभीरतेने घ्यावा अन्यथा पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली प्रश्न मार्गी न लागल्यास सिडको वर मोर्चा काढण्यात येईल अथवा जन आंदोलन छेडण्यात येईल. आजच्या बैठकीत भाजपा ज्येष्ठ नेते दिलीप जाधव, जयवंतराव पाटील, सावित्री राव, शुभलक्ष्मी शिवाकुमार,शैलेंद्र शेजवळ, डॉ.स्वामीनाथ ढवळे, शशी कुमार,भूषण मुळे,भाजपा उद्योग आघाडीचे संयोजक भरत कोंढाळकर, भाजपा युवा मोर्चा सचिव आदित्य हातगे, प्रशांत पाटील यासह नागरिक उपस्थित होते.