निकृष्ट दर्जाची विकासकामे करणाऱ्या मेसर्स. डी. बी इन्फ्रावर कारवाई करा-आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी

 निकृष्ट दर्जाची विकासकामे करणाऱ्या मेसर्स. डी. बी इन्फ्रावर कारवाई करा-आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी



पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिका हद्दीत निकृष्ट दर्जाची विकासकामे करणाऱ्या मेसर्स. डी. बी इन्फ्रा या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे केली आहे.
        पनवेल महानगरपालिका हद्दीतील कळंबोली येथील सेक्टर १२ मधील भूखंड क्रमांक १२ बी, सेक्टर ११ मधील भुखंड क्रमांक २३ बी, तसेच आसुडगाव सेक्टर ५, भूखंड क्रमांक २८ येथील उद्यान विकसीत करण्याचे काम मेसर्स डि.बी इन्फ्रा या ठेकेदारास मिळाले होते. परंतु ठेकेदाराने या तीनही उद्यानाचे काम  निकृष्ट  दर्जाचे काम केल्याचे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी महापालिकेच्या निदर्शनास आणून देत ठेकेदारामार्फत झालेल्या अतिशय निकृष्ठ कामाची योग्य दुरुस्ती करण्याची सूचना केली होती. तसेच तोपर्यंत सदर ठेकेदारास कोणत्याही प्रकारचे बिल अदा करण्यात येऊ नये आणि सदचे काम पूर्ण होईपर्यंत या ठेकेदारास पनवेल महानगरपालिकेचे कोणतेही काम देण्यात येऊ नये असेही महापालिकेला कळविण्यात आले होते. मात्र पनवेल महानगरपालिकेमार्फत सदर ठेकेदारावर ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले होते. 
       त्याचबरोबर खारघर येथील सहा पेक्षा जास्त निर्माणाधीन असलेल्या उद्यानाच्या संदर्भातही स्थानिक लोकप्रतिनिधींच्या तक्रारी प्राप्त झाल्याने त्या सर्व उद्यानांची पनवेल महानगरपालिकेचे अभियंता राजेश कर्डिले यांनी प्रत्यक्ष स्थळी संयुक्त पाहणी करण्यात आली होती. या पाहणीत उद्यानांची कामे देखील अतिशय  निकृष्ट दर्जाचे झाल्याचे निदर्शनास आले व त्यामुळे सदरच्या कामांची दुरुस्ती करुन घेण्यात यावी, असे राजेश कर्डिले यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात त्याठिकाणी आजपर्यंत कागदी घोडे नाचविण्याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे जनतेच्या पैशांचा चुराडा करण्याचे काम ठेकेदाराकडून झाले आहे. सार्वजनिक निधीचा अपव्यय होऊ नये आणि नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात तसेच स्थानिक नागरिकांकडून आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांनी या संदर्भात महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांना पत्र देऊन सखोल चौकशी करून ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.  त्या अनुषंगाने सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्याचे समजते.