नमो चषकात खेळाडूंच्या कलागुणांना वाव; नमो चषकात खेळाडूंची विशेष काळजी
पनवेल (प्रतिनिधी) लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व उरणच्या वतीने उलवा नोडमध्ये सुरु असलेल्या 'भव्य क्रीडा महोत्सव नमो चषक २०२५' स्पर्धेला दिवसेंदिवस खेळाडू आणि क्रीडा रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत होत असलेल्या या नमो चषक क्रीडा स्पर्धेत खेळाडूंची विशेष काळजी घेण्यात आली आहे. नाश्ता, भोजन, प्रवास, प्राथमिक उपचार, आसन व्यवस्था, मदत कक्ष व इतर सुविधाही त्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या क्रीडा महोत्सवात राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा, खो-खो, कबड्डी तसेच धावणे, भाला फेक, थाळी फेक, गोळा फेक, कीड व्हेलीन थ्रो, हातोडा फेक या अॅथलेटीक्स स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सात हजारपेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग लाभला आहे.
२३ जानेवारीला राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा प्रकाश झोतात मोठ्या उत्साहात पार पडली. २४ जानेवारीला प्रकाश झोतात कबड्डी स्पर्धा होत असून २५ जानेवारीला खो-खो स्पर्धाही प्रकाश झोतात होणार आहे. तर धावणे, भाला फेक, थाळी फेक, गोळा फेक, कीड व्हेलीन थ्रो, हातोडा फेक या अॅथलेटीक्स स्पर्धा तीनही दिवस म्हणजेच २५ जानेवारीपर्यंत दिवसा होणार आहेत. एकूण तब्बल १४ लाख ९१ हजार २०० रुपयांची रक्कम आणि चषक अशा प्रकारे पारितोषिकांचे स्वरूप आहे. स्पर्धा संपन्न झाल्यानंतर त्या त्या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना बक्षिसे देऊन सन्मानित केले जात आहे. या नमो चषकामुळे खेळाडूंच्या कला गुणांना वाव मिळण्यास मोठी मदत झाली असून खेळाडू आणि क्रीडाप्रेमींकडून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, मुख्य आयोजक परेश ठाकूर आणि सहकाऱ्यांचे धन्यवाद मानले जात आहे. दर्जेदार आयोजन आणि त्याचबरोबरीने व्यवस्था उत्तम प्रकारे या ठिकाणी अधोरेखित होते. युवा खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी या ठिकाणी देशातील नामांकित क्रीडापटूंचे बॅनर लावण्यात आले असून त्यातून त्यांना प्रेरणा देणारी माहितीही यामध्ये नमूद करण्यात आली आहे. दरम्यान या सर्व क्रीडा प्रकारात होत असलेल्या स्पर्धातून अनेक सामने रोमहर्षक पहायला मिळाले आणि त्याचा क्रीडारसिकांनी मनमुराद आनंद घेतला.