चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स अँड सायन्स कॉलेज , न्यू पनवेल (स्वायत्त) येथे नॅक पिअर टीमची व्हिजीट
पनवेल (प्रतिनिधी) राष्ट्रीय मुल्यांकन आणि मान्यता परिषद ही देशभरातील उच्च शिक्षण प्रदान करणाऱ्या शैक्षणिक संस्थानांचे शास्त्रीय पद्धतीने शैक्षणिक परीपेक्ष्य, अध्ययन-अध्यापन प्रणाली, विस्तारकार्य, संशोधन, पायाभूत सुविधा, व्यवस्थापन आदी निकषांच्या आधारे मुल्यांकन करून त्यांना श्रेणी प्रदान करते. याच धर्तीवर जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या चौथ्या मूल्यांकनाच्या फेरीसाठी नॅक पिअर टीमची भेट दि. २ आणि ३डिसेंबर २०२४ रोजी यशस्वीपणे संपन्न झाली. या शैक्षणिक मुल्यांकन भेटी दरम्यान नॅक पिअर टीम सदस्यांनी महाविद्यालयातील विविध शैक्षणिक, सह-शैक्षणिक, विस्तार विभाग तथा महाविद्यालयातील पायाभूत सुविधांची पाहणी केली.
नॅक पिअर टीमचे चेअरमन कलिंगा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. श्रीधर, समन्वयक सदस्य म्हणून सरदार पटेल विद्यापीठ, गुजरात मधील जैविक विज्ञान विभागाचे प्रमुख प्रो. डॉ. कमलेशकुमार पटेल व सदस्य म्हणून यमुनानगर हरियाणा येथील गुरुनानक गर्ल्स कॉलेज च्या संचालिका डॉ. वरिंदर गांधी यांचे महाविद्यालयाच्या संकुलात दि.०२ डिसेंबर २०२४ रोजी आगमन झाले. महाविद्यालयाच्या एन.सी.सी. विभागाच्या विद्यार्थ्यांनी नॅक पिअर टीम सदस्यांना मानवंदना दिली. या नंतर जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी नॅक पिअर टीम सदस्यांचे यथोचित स्वागत व सत्कार केला. स्वागतानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील यांनी महाविद्यालयाचे नॅक पिअरटीम सदस्यांसमक्ष सर्वंकष सादरीकरण केले. त्यानंतर अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रो. डॉ. बी. डी. आघाव यांनी सादरीकरण केले. तसेच विविध शैक्षणिक विभागांचे सादरीकरण होऊन समितेने विस्तार उपक्रमांच्या विभागांना, ग्रंथालय, आदी सुविधांना भेट दिली.
सर्व विभागांच्या भेटी संपन्न झाल्यानंतर विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक, यांच्यासोबत परिसंवाद झाला. यानंतर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. डॉ. रवींद्र कुलकर्णी आणि प्र. कुलगुरू डॉ. अजय भामरे यांनी महाविद्यालयास भेट दिली. दिवसाच्या शेवटी सांस्कृतिक कार्यक्रमाने पहिल्या दिवसाची सांगता झाली. भेटीच्या दुसऱ्या दिवशी महाविद्यालयाच्या बॉटनिकल गार्डन, बायोफर्टीलायझर प्लांट या ठिकाणी भेट दिली. दुपारनंतर मूल्यमापन अहवाल लेखन आणि समारोप कार्यक्रमानंतर यशस्वीरीत्या सांगता झाली.