स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी हजारोच्या संख्येने धावले पनवेलकर;महापालिकेच्यावतीने 'स्वच्छता रन'चेआयोजन



स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी हजारोच्या संख्येने धावले पनवेलकर;महापालिकेच्यावतीने  'स्वच्छता रन'चेआयोजन

*स्वच्छता ही सेवा मोहीमेंतर्गत स्वच्छता मोहीम*


पनवेल,दि.2: 'स्वच्छता ही सेवा' मोहीमेंतर्गत आयुक्त श्री. मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक २ ऑक्टोबर महात्मा गांधींच्या जयंतीचे औचित्य साधून पाच किलोमीटरच्या 'स्वच्छता रन'चे आयोजन वडाळा तलाव येथे करण्यात आले. या  स्वच्छता रनमध्ये सुमारे साडेतीन हजार नागरिकांनी सहभाग नोंदविला. यावेळी सर्वांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली. 

यावेळी आमदार श्री. प्रशांत ठाकूर, आयुक्त श्री. मंगेश चितळे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, सहायक आयुक्त डॉ. रूपाली माने, विभाग प्रमुख अनिल कोकरे, मुख्य आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड,वैद्यकीय अधिकारी,महापालिका अधिकारी, आरोग्य निरीक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वच्छ भारत अभियानाच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालय आणि केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने १७ सप्टेंबर  ते २ ऑक्टोबर या कालावधीत गेल्या पंधरा दिवसापासून पनवेल महापालिकेच्यावतीने स्वच्छ भारत अंतर्गत स्वच्छता ही सेवा मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता रनच्या माध्यमातून या मोहिमेचा शेवट करण्यात आला. 

यावेळी मार्गदर्शन करताना आमदार श्री. प्रशांत ठाकूर म्हणाले , स्वच्छतेसाठी नागरिकांनी एक पाऊल पुढे टाकत स्वत: रस्त्यावर कचरा करणार नाही, इतरांना कचरा करू देणार नाही असे ठरविले तर आपल्या परिसरात कचरा होणार नाही,त्यामुळे आपले शहर स्वच्छ होईल,पर्यायाने शहर सुंदर होईल.यासाठी आपण प्रतिज्ञाबध्द होण्याचा संदेश यावेळी त्यांनी दिला. 

तसेच यावेळी स्वच्छता रन मध्ये सहभागी झालेल्या विविध सामाजिक संघटना, विविध महाविद्यालये शाळा यांच्या प्रतिनिधींना स्मृतीचिन्ह  देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सहभागी सर्व नागरिकांना, विद्यार्थ्यांना मेडल व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. 

चौकट

*सहभागी महाविद्यालये व सामाजिक संस्था*

सीकेटी कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स, रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स,रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल,पिल्लिई कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स, पिल्लईचे अभियांत्रिकी महाविद्यालय,केएलई कॉलेज, रामशेठ ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सीकेटी विद्यालय नवीन पनवेल, सीकेटी कनिष्ठ महाविद्यालय नवीन पनवेल, टिळक ज्युनियर कॉलेज, नेरुळ

स्वयंसेवी संस्था:

रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगर ,रनथॉन सायकलिंग क्लब, निसर्ग मित्र संस्था

चौकट

 'स्वच्छता ही सेवा' मोहीमेंतर्गत वडाळा तलाव परिसरात स्वच्छता मोहीमेचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त श्री.मंगेश चितळे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते , विभाग प्रमुख अनिल कोकरे, मुख्य आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी सर्वांनी वडाळे तलावाशेजारील रस्त्यांची साफसफाई केली.