रेशनकार्डवर सही असणाऱ्या "त्या साहेबांवर"देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तपास सीबीआयकडे वर्ग करा : पत्रकार मित्र असोसिएशनची मागणी

रेशनकार्डवर सही असणाऱ्या "त्या साहेबांवर"देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तपास सीबीआयकडे वर्ग करा : पत्रकार मित्र असोसिएशनची मागणी



पनवेल / प्रतिनिधी
      पनवेल तहसील कार्यालयात सध्या दादागिरीला उधाण आले आहे. रेशनकार्ड साठी सर्वसामान्य लोकांची आर्थिक पिळवणूक केली जाते. आर्थिकदृष्टया मागास असलेल्यांसाठी स्वस्त दरात धान्य उपलब्ध व्हावे तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्हणून रेशनकार्ड दिले जात असले  तरी या गरीब लोकांकडून पैसे खाण्याचे प्रमाण तहसील कार्यालयात सुरु आहे. २२ ऑगस्ट रोजी आनंद गुरव याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहाथ पकडले. तो सांगतो "मी साहेबांना देण्यासाठी पैसे घेतो". मात्र हे साहेब कोणते त्यांची चौकशी करावी. या प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंध कार्यालयाची कामगिरी संशयास्पद असल्याने सदर प्रकरण सीबीआयकडे द्यावे आणि दोषी असणाऱ्याअधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी पत्रकार मित्र असोसिएशनने केली आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण व्ही. के. पाटील, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
      गोरगरीब लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी रेशनकार्ड अर्थात शिधापत्रिका उपयोगी ठरते. शिधापञिका मिळविताना ओळख पटविण्यासाठी  उत्पन्नाचा दाखला, ओळखपत्र यासारखे काही निकष शासनाने लावलेले आहेत. मात्र नाममात्र कागदपत्रांमध्ये तुम्हाला आम्ही शिधापञिका मिळवून देतो असे आमिष दाखवत पनवेल तहसिल कार्यालयात सध्या एजंटचा सुळसुळाट झाला आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ मिळेल त्यासाठी काही कागदपञे नसली तरी आपले काम होईल या गरजेपोटी काही लोक अशा एजंटच्या नादी लागतात. काही तर उसनवार पैसे आणून साहेबांना पुरवितात असे एजंटलोक स्वत:च सांगतात. मग हे कोणते पैसे  मागतात ? त्यांच्यामुळे सर्वसामान्यांची किती फरपट होते हे  परिस्थिती पाहिल्यानंतर लक्षात येईल. आनंद गुरवला अटक करतेवेळी त्याच्याकडे आणखीही काही शिधापत्रिका होत्या. त्यांच्यावर सही कोणाची असेल याची हे प्रथमदर्शनी कोणीही सांगू शकते. मग कोणतीही कागदपत्रे नसतील आणि फक्त पैसे घेउन रेशनकार्ड मिळत असेल तर भविष्यात कोणीही असे रेशनकार्ड बनवू शकते. अलीकडे बेकायदेशीर रित्या बांगलादेशी तसेच अन्य देशातून आलेल्या लोकांचे वास्तव्य उघडकीस येत आहे. असे अनेक लोकही ओळख दाखविण्यासाठी या पैसे देउन  घेतलेल्या रेशनकार्डचा सर्रास गैरवापर करतील. त्यामुळे पनवेल तहसील कार्यालयात अशा  पैसेखोर साहेबांचा तपास करुन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून  कारवाई करावी अशी मागणी पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे संस्थापक केवल महाडीक, अध्यक्ष भागवत अहिरे, उपाध्यक्ष सुनील भोईर, कार्याध्यक्ष नितीन जोशी यांनी केली आहे.