तारीख संपली तरीही आनंदाच्या शिधाचे 100% वाटप नाही


तारीख संपली तरीही आनंदाच्या शिधाचे 100% वाटप नाही


नवीन पनवेल : 22 जानेवारी ते 19 फेब्रुवारी पर्यंत आनंदाचा शिधा वाटप करण्याचे शासनाने ठरवले होते. मात्र तारीख संपून दहा दिवस झाले तरी देखील पनवेल तालुक्यात 83 टक्केच आनंदाच्या शिधाचे वाटप करण्यात आले आहे. अद्याप 100% वाटप झाले नाही.
      22 जानेवारी 19 फेब्रुवारी पर्यंत एक किलो साखर, एक किलो खाद्यतेल, चणाडाळ, रवा, मैदा व पोहे प्रत्येकी अर्धा किलो याप्रमाणे सहा वस्तूंचा संचय असलेला संच म्हणजे आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार होता. यासाठी प्रत्येक शिधापत्रिकाधारकांकडून फक्त शंभर रुपये घेण्यात येणार होते. तालुक्यात 199 रेशनिंग ची दुकाने असून 6 हजार 664 अंत्योदय कार्डधारकांना आणि 69 हजार 237 प्राधान्य कार्डधारकांना हा आनंदाचा शिधा पनवेल तालुक्यात देण्यात येणार होता. यापैकी 58 हजार 341 शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्यात आलेला आहे. 19 फेब्रुवारी नंतर दहा दिवस उलटून गेले तरी देखील शंभर टक्के आनंदाचा शिधाचे वाटप करण्यात रेशनिंग दुकानदारांना अपयश आले आहे. त्यामुळे काही  शिधापत्रिकाधारक आनंदाच्या शिधापासून वंचित राहिलेले आहेत. त्याबाबत पुरवठा अधिकारी प्रदीप कांबळे यांना विचारले असता 83% आनंदाच्या शिधाचे वाटप झाले असल्याचे त्यांनी सांगितले. विहित वेळेत आनंदाच्या शिधाचे वाटप न केलेल्या रेशनिंग दुकानदारांवर काय कारवाई होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.