मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे पनवेल महापालिकेकडून आजपासून सर्वेक्षण सुरु
पनवेल,दि.23: राज्य मागासवर्ग आयोगामार्फत सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी आज दिनांक 23 जानेवारीपासून युद्धपातळीवर महापालिकेच्या मनुष्यबळाकडून कालबद्धरितीने अचूक सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. कामकाजाकरीता सोसायट्यांमध्ये येणाऱ्या प्रगणकांना सर्वतोपरी सहकार्य करावे व आपल्या सोसायटीतील सर्व सदस्यांना याबाबतची पूर्वसूचना द्यावी असे आवाहन आयुक्त श्री. गणेश देशमुख यांनी पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांना केले आहे.
पनवेल महापालिका हद्दीत घरोघरी जाऊन होणाऱ्या या सर्वेक्षणासाठी महापालिकेच्यावतीने सुमारे ६०० कर्मचारी व ४० पर्यवेक्षकांची निवड करण्यात आली आहे. या सर्वेक्षणासाठी शासनाच्यावतीने मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे. खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल चारही प्रभागासांठी प्रभाग अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
महापालिकेचे हे कर्मचारी प्रगणक म्हणून गृहभेटी देणार असून शासनाने दिलेल्या विहित नमुन्यातील माहिती संकलित करणार आहे. या कर्मचाऱ्यांना अचूक व बिनचूक माहिती द्यावी तसेच या कालावधीत उपलब्ध रहावे. हे काम अत्यंत महत्वाचे असल्याने या सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त गणेश शेटे यांनी केले आहे.