हरविलेली उरण मधील अल्पवयीन मुलगी मुस्कान सापडली.पोलिसांचे सर्वत्र कौतुक.
उरण दि ८(विठ्ठल ममताबादे )
उरण येथील मिसिंग मुलगी मुस्कान नवनित चौधरी वय १३ वर्ष हिचा मागील दहा ते पंधरा दिवसापासून उरण पोलीस सखोल तपास करत असताना दिनांक ०४ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी 3 चे दरम्यान मुस्कान च्या आईच्या मोबाईल वरती एक अनोळखी नंबर वरून फोन आला व त्यांनी मुस्कान ची थोडक्यात माहिती घेतली व फोन कट केला. मुस्कान च्या आई-वडिलांनी पोलीस प्रशासनाला संपर्क करून फोन केलेल्या व्यक्तीचा नंबर दिला असता त्या नंबरची माहिती पोलिसांनी घेतली त्यावेळी सदरचा नंबर जळगाव येथील असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर लागलीच पोलिसांनी वरिष्ठांची परवानगी घेऊन जळगाव येथे रवाना झालो . सदर ठिकाणी पोलीस गेले असता मुलगी मुस्कान चौधरी ही एका बालकाश्रमात मिळून आली. मुस्कान ही तिची आई वडील रागावल्याने वृंदावन ,मथुरा उत्तर प्रदेश येथे रेल्वेने जात होती त्यावेळी रेल्वे पोलिसांनी मुस्कान एकटी दिसल्याने तिला भुसावळ रेल्वे जंक्शन येथून ताब्यात घेऊन जळगाव मधील बालकाश्रमामध्ये दाखल केल्याचे उरणच्या पोलिसांना समजले. मुस्कान चौधरी ही सुखरूप तीच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आली आहे . मुस्कानचे आई-वडिलांनी हरविलेली मुलगी मुस्कान सापडल्या बद्दल पोलिसांचे तसेच पत्रकार विठ्ठल ममताबादे यांचे आभार मानले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम उरण पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुरज कांबळे तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, पोलीस हवालदार बलदेव अधिकारी, पोलीस शिपाई रियाज शेख, महिला पोलीस शिपाई वैशाली पाटील यांनी सदरचा गुन्हा तपासून मुलीचा शोध यशस्वीपणे घेतला आहे.सर्व नागरिकांनी पोलिसांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक केले आहे.