रुग्णालयात उपचार घेतलेल्या आजींना मनसेचा आधार;एमजीएम रुग्णालयात परिचारिकेच्या चुकीमुळे आजींना मनस्ताप

रुग्णालयात उपचार घेतलेल्या आजींना मनसेचा आधार;एमजीएम रुग्णालयात परिचारिकेच्या चुकीमुळे आजींना मनस्ताप



दारिद्य्र रषेखालील रेशन कार्ड असताना पैसे भरण्याची वेळ

पनवेल : राज भंडारी

मुंबईतील भांडुप येथील एक आज्जी या पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांची नात होती. सदर आज्जींचे पिवळे रेशन कार्ड म्हणजेच दारिद्य्र रेषेखालील रेशन कार्ड असताना येथील एका परिचारिकेच्या चुकीमुळे ते केशरी दाखविले गेले. आणि उपचार झाल्यानंतर या आज्जींकडून रुग्णालय व्यवस्थापनाने पैशाचा तगादा लावला. सदर बाब मनसेच्या येथील पदाधिकाऱ्यांना कळताच या आज्जींसाठी मनसेच्या महिला पदाधिकारी पुढे आल्या आणि यातून आजींना रुग्णालयाच्या गलथान कारभारातून बाहेर काढले.

याबाबत अधिक माहिती घेतली असता, भांडुप येथील प्रभावती रागुनाथ मांढरे या आज्जी गरीब असल्यामुळे शासकीय योजनांच्या आधारावर उपचार करून घेण्यासाठी आपली नात स्नेहल मांढरे हिच्यासोबत पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात आल्या होत्या. त्यांचे पिवळे रेशन कार्ड असल्यामुळे त्यांच्यावरील उपचार हे शासकीय योजनांमधून होतील यासाठी त्यांनी आपले उपचार करून घेतले. मात्र रुग्णालयातून घरी जाण्याच्या वेळेस रुग्णालय प्रशासनाने त्यांच्याकडे पैसे भरावे लागणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी आपले पिवळे रेशन कार्ड असल्याचे सांगितले असता रुग्णालय प्रशासनाच्या वतीने केशरी रेशन कार्ड नमूद करण्यात आल्याचे सांगितले. मुळात याठिकाणी नोंदणी करणाऱ्या परिचारिकेची चूक या आज्जींना महागात पडली होती. 

यावेळी आज्जींची नात असलेल्या स्नेहल यांनी मनसेच्या रायगड जिल्हाध्यक्षा सौ.अदिती आशिष सोनार यांच्याशी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास संपर्क साधला. मात्र आदिती या बाहेरगावी असतानाही त्यांनी आपल्या सहकारी तथा मनसेच्या कळंबोली उपशहर अध्यक्षा सौ. सोनल प्रशांत कदम यांना सदर घटनाक्रम सांगून मदत करण्यास सांगितले. त्यानुसार सोनल कदम यांनी सकाळी एमजीएम रुग्णालय गाठून रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरून आजींना न्याय मिळवून दिला. यावेळी सोनल कदम यांनी या आजींना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळवून दिला तसेच या आज्जीचे बिल देखील माफ करून दिले.

कोट

रात्री ८ : ३० वाजण्याच्या सुमारास मला एक अनोळखी कॉल आला. मात्र समोरून एमजीएम रुग्णालयाचा गलथान कारभार एकायला मिळाला. राज साहेबांची शिकवण आणि मनसे या शब्दाचा अर्थच मुळात मदत नव्हे सेवा असा असल्यामुळे आम्ही तात्काळ हालचाली सुरू केल्या. मी बाहेरगावी असल्यामुळे माझी सहकारी सोनल कदम हिने या प्रकरणात आज्जीना मदत नव्हे सेवा दिली. आम्ही मनसैनिक नेहमीच जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहिलो होतो आणि यापुढेही राहणार.
- सौ.अदिती सोनार, जिल्हाध्यक्षा, रायगड मनसे