पनवेल महानगरपालिका जनसंपर्क कक्ष
दिनांक : 27.7.2023
वृत्त क्र.144
मालमत्ता कर बिलांसदर्भात हरकती, दुरूस्तीवरती महापालिकेच्यावतीने तातडीने कार्यवाही
पनवेल,दि.27: पनवेल महानगरपालिका मार्फत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामधील तरतुदीनुसार कर निर्धारण करण्यात आलेले आहे. सदर कर निर्धारण करतांना, कराधान नियमान्वये मालमत्ता धारकांना विशेष नोटीस बजावण्यात आली होती व हरकती, सुचना मागविण्यात आल्या होत्या. प्राप्त हरकती सुचनाबाबत कायद्यातील तरतुदीनुसार सुनावणी घेवुन अंतिम यादी प्रसिध्द करुन कर देयके बजावण्यात आली आहेत. काही कारणांनी मालमत्ता धारकांनी विहीत कालावधीत आपल्या देयकाबद्दलच्या सुचना हरकती मांडल्या नाहीत, अशा मालमत्ताधारकांना नैसर्गिक न्यायाच्या दुष्टीने त्यांच्या मालमत्ता कर देयकांमध्ये कर निर्धारणाबाबत काही हरकती, दुरूस्यात् असल्यास त्यावरती मालमत्ता कर विभागामार्फत कार्यवाही करणेत येत आहे.
दिनांक 24 ते 28 जुलै, 2023 या कालावधीत महानगरपालिकेमार्फत विशेष पुन:निर्रिक्षण मोहिम सुध्दा राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये नागरिकांच्या सुचना ,हरकतीं लक्षात घेऊन त्यामध्ये तत्काळ बदल करून दिला जात आहे. या मोहिमेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून पहिल्या दिवशी एकुण 51 , दुसऱ्या दिवशी 111, तिसऱ्या दिवशी 175 तर आज चौथ्या दिवशी 229 नागरिकांनी आपल्या बिलामध्ये दूरूस्त्या करून घेतल्या. परंतू मालमत्ता धारकांना आक्षेप नोंदविणेसाठी समाज माध्यमातुन चुकीच्या पध्दतीने आवाहन करण्यात येत असल्याचे दिसुन आले. प्रामुख्याने सिडको क्षेत्रातील मालमत्ता धारकांना 129 अ कलमान्वये अर्ज करण्यासाठीचे आवाहन करण्यात येत आहे. या आधीही मालमत्ता धारक चुकीच्या आवाहनास बळी पडुन त्यांचे आर्थिक नुकसान झालेले आहे व मालमत्ता धारकांना नाहक शास्तीचा भुर्दंड सोसावा लागत आहे.
कोट
महापालिकेच्या सर्व प्रस्तावित कामांसाठी मालमत्ता कर हा प्रमुख स्त्रोत आहे. तसेच मा. न्यायालयानेही मालमत्ता कर,वसुलीला स्थगिती दिली नाही.त्यामुळे महापालिका मालमत्ता कराच्या वसुलीवर ती भर देत आहे. एप्रिल महिन्यापासून ते आजपर्यंत महापालिकेने 160 कोटीहून अधिक वसुली केली आहे.नागरिकांनी आपल्या मालमत्ता बिलासंर्भात असणाऱ्या हरकती सध्या सुरू असलेल्या पुर्न निरीक्षण मोहिमेंतर्गत सादर करुन,त्यांचे निराकरण करावे.
आयुक्त श्री. गणेश देशमुख, पनवेल महानगरपालिका
चौकट
*मालमत्ता धारकांना कलम 129 अ अन्वये सवलत*
कलम 129 अ अन्वये सवलत मागताना, ग्रामपंचायत ॲसेसमेंट उतारा व ग्रामपंचायतीला कर भरणा केलेली पावती संबंधीत मालमत्ता धारकांनी सदरची कागदपत्रे जोडुन विनंती अर्ज करावा. सदर अर्जाची तपासणी करुन दखल घेतली जाईल याची मालमत्ता धारकांनी नोंद घ्यावी. तसेच ग्रामपंचायत कालावधीत कर भरणे आवश्यक असतानाही तो भरला नसल्यास, तो व्याजासह किती होतो , याचीही माहीती मालमत्ताधारकांनी स्वयंस्फुर्तीने सादर करावी.