शहरातील 63 चौकांचे काँक्रिटीकरण पूर्ण व उर्वरित 15 चौकांचे काम गतीने सुरु
खड्डेमुक्त रस्ते आणि चौक ही संकल्पना नजरेसमोर ठेवून सन 2012-13 मध्ये सुप्रिम कोर्टाने मुंबई महानगर प्रदेशातील शासकीय प्राधिकरणांना व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेल्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने याकड़े विशेष लक्ष दिले आहे. यादृष्टीने कुठेही खड्डा आढळल्यास तो त्वरित दुरुस्त करण्यासाठी वार्षिक देखभाल दुरुस्तीचे कंत्राट कार्यान्वित केले आहे. ही बाब तक्रार निवारण प्रणालीशी (Greivance Redressal System) संलग्न करण्यात आली असून 8424948888 हा व्हॉट्सॲप क्रमांक नागरिक संपर्कासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
यामध्ये विशेष बाब म्हणजे महानगरपालिका क्षेत्रातील चौकांमध्ये होणारी वाहतुक कोंडी टाळण्यासाठी चौकासभोवतालचे रस्ते काँक्रिटीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. चौकांचा प्राधान्यक्रम लक्षात घेऊन हे काम नवी मुंबई महानगरपालिकेने सुरु केले असून आत्तापर्यंत 88 पैकी 63 चौकांचे काम पूर्ण झाले आहे. यामध्ये बेलापूर विभागात 7, नेरूळ विभागात 21, वाशी विभागात 4, तुर्भे विभागात 10, कोपरखैरणे विभागात 3, घणसोली विभागात 14, ऐरोली विभागात 4 अशा एकूण 63 चौकांचे काँक्रिटीकरण पूर्ण झालेले आहे. नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी शहर आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार पावसाळा कालावधीपूर्वी सदर काम गुणवत्ता जपत पूर्ण करण्यात आलेले आहे.
यामधील उर्वरित 15 चौकांचे काम पावसाळा कालावधीच्या अनुषंगाने थांबविण्यात आले होते. तथापि नवी मुंबई वाहतुक पोलीस विभागाशी झालेल्या चर्चेनुसार या कामाची गरज लक्षात घेता व पावसाळ्यानंतर लगेचच नवरात्र. दसरा, दिवाळी अशा सण, उत्सवांचा कालावधी लक्षात घेता पावसाळी कालावधीत पावसाला जरा उघडीप प्राप्त झाल्यानंतर हे चौक काँक्रिटीकरणाचे काम करणे शक्य आहे. या कालावधीत काँक्रिटचे क्युरींगही व्यवस्थित होते हे लक्षात घेत पाऊस जरा कमी झाल्यावर हि कामे करावीत असे सूचित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका तपासणी करीत असून त्यानुसार कोणत्या कालावधीत पावसाळ्यामध्ये काम करणे शक्य आहे याचा मागोवा घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे उर्वरित 10 चौकांच्या काँक्रिटीकरणाची कामे पावसाळ्यानंतर करण्यात येणार आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने चौक काँक्रिटीकरणाची कामे गतीने पूर्ण करण्यात येत असून त्यामध्ये नागरिकांना रहदारीसाठी तसेच वाहतुकीसाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. शहरात ठिकठिकणी झालेल्या चौकाच्या काँक्रिटीकरण कामांमुळे पावसाळ्यातही वाहतुक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे असे शहर अभियंता श्री. संजय देसाई यांनी सांगितले आहे.