संगीत शास्त्र सौंदर्य तत्व संकल्पनेला उजाळा देणारा कार्यक्रम; पंडित उमेश चौधरी यांच्या शास्त्रीय गायनाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध

संगीत शास्त्र सौंदर्य तत्व संकल्पनेला उजाळा देणारा कार्यक्रम; पंडित उमेश चौधरी यांच्या शास्त्रीय गायनाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध 


पनवेल(प्रतिनिधी) सुप्रसिद्ध सतारवादक उस्ताद अझीम खान यांच्या संकल्पनेनुसार बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे लघुनाट्यगृहात झालेल्या 'घराणा रंग' या संगीत संवादात्मक उत्सवात पनवेलचे सुपूत्र तथा सांस्कृतिक सेलचे तालुका अध्यक्ष संगीत विशारद रायगड भूषण पंडित उमेश चौधरी यांच्या शास्त्रीय गायनाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. संगीत शास्त्र सौंदर्य तत्व आधारित संकल्पनेला उजाळा देणारा कार्यक्रम ठरला, त्यामुळे रसिकांनी या पर्वणीचा आनंद घेतल्याची पोचपावती त्यांची प्रशंसा करताना दिली. 

         संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्राला संस्कृती आणि कलेचा वारसा आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातील कलाकारांची मांदियाळी आहे. अशातच अनेक तप संगीत साधनेची सेवा करणारे या भूमीला लाभले आहेत. त्या अनुषंगाने शास्त्रीय संगीत साधनेचा जागर नवीन पिढीला अवगत व्हावा, यासाठी नादब्रह्म परिवार बोरिवलीच्या वतीने पंडित उमेश चौधरी यांच्या संगीत सुरमयी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
प्रख्यात गायक उमेश चौधरी, संगीत शास्त्र तज्ज्ञ उस्ताद अजीम खान आणि संगीत रत्नाकर ग्रंथाचे निष्णात प्राचार्य विजया पाटील यांच्या सहभागाने झालेल्या या संगीत कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 
       कार्यक्रमाच्या सुरुवातीला रागदारी संगीतामधील अविर्भाव, तिरोभाव या संगीत सौंदर्य तत्वांचे महत्व आणि त्याचे विश्लेषण पंडित उमेश चौधरी यांच्याकडून संगीत श्रोत्यांनी व विद्यार्थ्यांनी जाणून घेतले. या नंतर उमेश चौधरी यांनी आपल्या गायनाला प्रारंभ राग भिमपलासच्या 'बडा खयाल'ने केला. त्यानंतर राग खमाज, तिलंग व सोहनी रागातील बंदिशी गाऊन श्रोत्यांची मने जिंकली. शेवटी अबीर गुलाल, हेचि दान देगा हि भजने सादर करून भगवान पांडुरंगाच्या गजराने नाट्यगृह दुमदुमले होते.  यावेळी उमेश चौधरी यांना तबल्यावर किशोर पांडे, पखवाज सुनील म्हात्रे, संवादिनीवर भक्ती ब्रहो घैसास, तानपुरा मंगेश चौधरी, अक्षय चौधरी तर टाळ वर मधुरा म्हात्रे यांची साथ लाभली. दोन तपहुन अधिक काळापासून पंडित उमेश चौधरी यांनी आपल्या अथक साधनेने गायन कलेवर प्रभुत्व निर्माण केले आणि या गायन तपस्येतून त्यांनी अनेक पुरस्कार, मानसन्मान, नामांकने मिळवली असून संपूर्ण देशभर त्यांच्या शास्त्रीय गायन कार्यक्रमाचे आयोजन विविध संस्थांकडून होत असते. त्याच अनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात गायिका विदुषी अर्चना कान्हेरे, सतारवादक उस्ताद अजीम खान, सरोद वादक विवेक जोशी, विदुषी लता रानडे आदी मान्यवर उपस्थित होते. 
Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image
फसवे सोशल मीडिया ग्रुप्स आणि अनधिकृत गुंतवणूक योजनांबद्दल सतर्क रहा -एंजेल वनचे आवाहन
Image