महावितरणचा महाताप;तारखेआधीच वीज कनेक्शन कापण्याची वसूली पथक देतात धमकी

महावितरणचा महाताप;तारखेआधीच वीज कनेक्शन कापण्याची वसूली पथक देतात धमकी  


पनवेल/प्रतिनिधी

पनवेल महावितरण कार्यालयातील कर्मचारी पनवेल शहरात घरोघरी जावून वीज बिल आजच भरा, अन्यथा वीज कनेक्शन कापून टाकू अशी महिला वर्गाला देत घाबरवून सोडत आहेत. विशेष म्हणजे वीज बिल भरण्याच्या अंतिम तारखेच्या चार ते पाच दिवस अगोदरच हा प्रकार घडत असल्याने नागरिक महावितरणच्या कर्मचार्‍यांबाबत तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. 
विजेचे दर दुपटीने वाढल्याने येणार्‍या अवाच्या सव्वा बिलांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्यातही सर्वसामान्य नागरिक महावितरणची देयके नियमित भरत असताना देखील कोणताही लेखी आदेश नसताना हे कर्मचारी नागरिकांच्या दारोदारी जावून बिल देयकाच्या अंतिम मुदतीपूर्वीच उर्मट भाषेत बिल भरण्याची सक्ती करत आहेत. महिला वर्गाची कुचंबणा होईल अशा प्रकारे त्यांचे बोलणे असते. अशा प्रकारे विज बिल वसूली करण्याचे लेखी आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून आलेले नाहीत. वीज बिल मुदतीत न भरल्यास त्यावर दंड आकारला जातो. मग असे असताना वसूली मोहिम राबविण्याची गरजच काय? वीज बिल वसूलीसाठी मुदतपूर्व तगादा लावणारे हे कर्मचारी वीज पुरवठा खंडीत झाल्यावर मात्र कधीच वेळेवर पोहचत नाहीत. तसेच वीज पुरवठा खंडीत झाल्यास फोन रिसीव्हर बाजूला काढून ठेवण्यात येतो त्यामुळे वीज महावितरणला संपर्क साधणेही कठीण होवून बसते. मग लाईट कधी येईल याची वाट पहात बसावे लागते.
ग्रामीण भागात वीज कर्मचार्‍यांना होणारी मारहाण योग्यच?
शहरीभागात सुशिक्षित नागरीक असल्याने कर्मचार्‍यांचे उर्मट बोलणे सहन करतात. मात्र ग्रामीण भागात जावून हे कर्मचारी ग्राहकांशी अरेरावीची व उर्मट भाषा वापरतात. तसेच शिव्यांची लाखोली वाहतात आणि त्यामुळे संतप्त ग्राहकाने जर अशा उर्मट कर्मचार्‍याला मारहाण केल्यास त्याची जबाबदारी केवळ ग्राहकावरच फोडणे योग्य आहे का? शासकीय कर्मचारी असल्याने कर्तव्य बजावताना मारहाण केल्याचा गुन्हा ग्राहकावरच नोंदविला जातो. 
- कविता पवार
वीजग्राहक
दहा तास बत्ती गुल
ठाणा नाका, खांदा गाव परिसरात रविवारी दहा तास बत्ती गुल होती त्यावेळी हे कर्मचारी कुठे होते. दहा तास वीज गेल्याने ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे केवळ वीज बिल वसूलीसाठीच हे कर्मचारी आहेत का असा प्रश्‍न नागरिक उपस्थित करीत आहेत. वीज पुरवठा सुरळीत सुरु ठेवणे हे या कर्मचार्‍यांचे कर्तव्य आहे.  त्यामुळे सोयीसुविधा पुरविताना महावितरणचे ढिसाळ कामकाज दिसून येते.

महावितरणकडून कायद्याची पायमल्ली
काही कारणामुळे बिल न भरल्यामुळे ठराविक मुदतीनंतर वीज कंपनीतर्फे ग्राहकाचा विद्युत पुरवठा खंडीत केला जातो. हा ग्राहकावर अन्याय आहे. वास्तविक विद्युत अधिनियमातील कलम 56 मधील तरदूतीनुसार विज बिलाची रक्कम भरण्याची जी मुदत दिली असते त्या मुदतीपर्यंत बिल भरले नाही तर वीज कंपनीने ग्राहकास 15 दिवसांची डीसकनेक्शन नोटीस देणे बंधनकारक आहे. मात्र त्यानंतरही ग्राहकाने बिल न भरल्यास वीज पुरवठा खंडीत करण्यात येतो. कुठलीही नोटीस न देता वीज पुरवठा खंडीत करणे हे बेकायदेशीर असून वीज कंपनी न्यायालयीन कारवाईस पात्र ठरते.