इपिलेप्सी/आकडी/अपस्मार (फेफरे/फिट) आजाराविषयीच्या जनजागृती शिबिरास उत्तम प्रतिसाद
जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आणि इपिलेप्सी फाउंडेशन, मुंबई चे अध्यक्ष डॉ.निर्मल सूर्या यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
अलिबाग, दि.3(जिमाका):- राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अलिबाग जिल्हा रुग्णालय व इपिलेप्सी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग जिल्हा रुग्णालय येथे इपिलेप्सी,आकडी,अपस्मार (फेफरे/फिट) आजाराविषयीच्या जनजागृती शिबिराचे आयोजन आज रविवार, 3 जुलै 2022रोजी करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आणि इपिलेप्सी फाउंडेशन, मुंबई चे अध्यक्ष डॉ. निर्मल सूर्या यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
यावेळी डॉ.सायली, पी.पी.पी कॉर्डीनेटर, एन.एच.एम, मुंबई तसेच आशिष बनसोडे, पी. पी.पी. कॉर्डीनेटर, डी.डी. ऑफिस, मुंबई यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपस्थित सर्व मान्यवरांचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या सी.एम.ई.च्या वेळी डॉ. सूर्या यांनी आपल्या भाषणात फाऊंडेशनचे हे 96 वे शिबीर असून या शिबिराच्या माध्यमातून इपिलेप्सी म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते याची जनजागृती करण्यात येऊन या आजारावरील योग्य औषधोपचार मोफत पुरविले जात असल्याचे सांगितले.
यावेळी उपस्थित डॉक्टरांनी या आजाराविषयीच्या शंका विचारल्या व त्या शंकांचे निरसन डॉ.सूर्या यांनी केले. या शिबिरात आकडी/फिट या आजाराच्या व्यक्तीसाठी आवश्यक असणाऱ्या तपासण्या, ईईजी, स्पीच थेरपी इ. ची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. तसेच या रुग्णांना औषधेही मोफत देण्यात आले.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर , डॉ.निर्मल सूर्या व त्यांच्या सर्व टिमचे स्वागत केले व रुग्णांना दिलेल्या औषधांबाबत व पुरविलेल्या सेवेबाबत त्यांचे आभार मानले. तसेच त्यांनी इपिलेप्सीबाबत माहिती देताना इपिलेप्सी रुग्णांना जास्त कालावधीच्या उपचारांची गरज असते, औषधे बरोबर व नियमित घेतली तर या आजारातून रुग्ण पूर्णपणे बरा होतो, अशी माहिती दिली.
निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन गुंजकर यांनी या शिबिराचे आयोजन केल्याबाबत सर्व वैद्यकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद गवई यांनी जिल्हा रुग्णालयाच्या वतीने प्रसारमाध्यम प्रतिनिधींचेही विशेष आभार मानले.
या शिबिराच्या माध्यमातून इपिलेप्सीच्या रुग्णांवर योग्य उपचार होण्यासाठी न्यूरॉलॉजिस्ट किंवा इपिलेप्टॉलॉजिस्ट (अपस्मार चिकित्सक) कडून एकूण १४५ रुग्णांची तपासणी, निदान व उपचार करण्यात आले.
यावेळी डॉ.सायली, पी.पी.पी कॉर्डीनेटर, एन.एच.एम, मुंबई तसेच आशिष बनसोडे, पी. पी.पी. कॉर्डीनेटर, डी.डी. ऑफिस, मुंबई डॉ.बी.एन. सावंत,न्यूरोलॉजिस्ट, मुंबई, डॉ.सौरभ कामत, न्यूरोलॉजिस्ट, मुंबई, डॉ.संतोष कोंडेकर, बालरोगतज्ञ डॉ. मेहुल देसाई, मानसोपचारतज्ञ व डॉ.अर्चना सिंग, मानसोपचारतज्ञ, डॉ.चेतना पाटील,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक ,संतोष पाटील, जिल्हा लेखा व्यवस्थापक, प्रथमेश मोकल, एफ.एल.सी. सुनिल चव्हाण, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदेश म्हात्रे, डॉ. रश्मी म्हात्रे,परिचारिका स्वागता जैन,प्रियंका गोगर,औषध निर्माता श्री.जाधव, श्री.सुर्वे, समन्वयक व टिम, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने हे उपस्थित होते.