युवासेना प्रमुख व मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रसाद सावंत यांची रुग्णालयात भेट घेऊन केली विचारपूस

युवासेना प्रमुख व मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रसाद सावंत यांची रुग्णालयात  भेट घेऊन केली विचारपूस 


पनवेल दि.२७ (वार्ताहर): युवासेना प्रमुख व मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज कामोठे एमजीएम रुग्णालयात जाऊन तेथे उपचार घेत असलेले माथेरान येथील शिवसेनेचे शहर संपर्क प्रमुख प्रसाद सावंत यांची भेट घेऊन त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती घेतली तसेच त्यांच्यावर होत असलेल्या उपचारा संदर्भात विचारपूस केली. 

       प्रसाद सावंत यांच्यावर २५ जून रोजी कर्जत येथे बंडखोर आमदार महेंद्र थोरवे यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. यावेळी ते जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ कामोठे एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज सदर रुग्णालयात जाऊन सावंत यांच्या तब्येतीची विचारपूस केली व त्यांना धीर दिला तसेच त्यांना देण्यात आलेल्या पोलीस संरक्षणा संदर्भात सुद्धा माहिती घेतली.   या वेळी उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, माथेरानचे माजी नगराध्यक्ष अजय सावंत, युवासेना रायगड जिल्हा युवा अधिकारी मयूर जोशी, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कोट : फुटीर आमदारांनी आमच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण त्याला तोडीस तोड उत्तर बहाद्दूर शिवसैनिकांनी दिला आहे. काही आमदारांना फसवून नेले आहे तर काहींचे अपहरण करून नेले आहे त्यांना परत येण्याची संधी आहे. पण ज्यांनी बंडखोरी केली आहे त्यांच्यात खरंच हिम्मत असेल तर राजीनामे देऊन निवडणुकीस सामोरे जावे. सध्यातरी आम्ही शांतता पाळण्याचे आवाहन केले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी.- शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे फोटो : आदित्य ठाकरे प्रसाद सावंत यांची विचारपूस करताना