महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगाची
कोकण विभागीय आढावा बैठक संपन्न
नवी मुंबई, दि. 20 :- महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत कोकण विभागात सन 2021-22 मध्ये ऑनलाईन पध्दतीने 1 लाख 79 हजार 591 अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी 1 लाख 41 हजार 285 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. निकाली काढलेल्या अर्जांपैकी 1 लाख 34 हजार 051 अर्ज विहित मुदतीत सेवा देऊन निकाली काढण्यात आले आहेत. या अधिनियमांतर्गत सर्वाधिक अपिल ठाणे जिल्ह्यात दाखल झाले असून, कोकण विभागात अव्वल कामगिरी झाली आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त दिलीप शिंदे यांनी दिली.
कोकण भवनात महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत कोकण विभागाचे राज्य लोकसेवा हक्क आयुक्त, अभय यावलकर, उप आयुक्त (प्रशासन) मनोज रानडे यांच्यासह कोकण विभागातील सर्व जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते.
पारदर्शकता, उत्तरदायित्व, कालबध्द सेवा, कार्यक्षमसेवा, माहिती तंत्रज्ञानाचा वापर व ई-प्रशासनाचा अवलंब ही महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम 2015 या कायद्याची मुख्य उद्दीष्टे आहेत. या कायद्यांतर्गत 506 सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. ज्या नागरिकांना आरटीएस महाराष्ट्र मोबाईल ॲप किंवा आपले सरकार आरटीएस पोर्टलचा वापर करणे शक्य नाही, अशा नागरीकांसाठी कोकण विभागात एकूण 3 हजार 238 आपले सरकार सेवा केंद्र व 42 आपले सरकार सेतु सेवा केंद्र कार्यरत आहेत. शहरी भागात 1 हजार 648 व ग्रामीण भागातील ग्रामपंचायत स्तरावर 1 हजार 548 आपले सरकार सेवा केंद्रे कार्यरत आहेत.
सर्व विभागांमध्ये जिल्हाधिकारी यांना नियंत्रक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले असून यासंबंधिचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.
यावेळी उपस्थितांना सादररीकरणाव्दारे माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष काम करताना येणाऱ्या अडचणींची चार्चा करण्यात आली. श्री. शिंदे यांनी अधिकाऱ्यांव्दारे विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.