नामदेववाडीतील नागरिकांचा प्रश्‍न सिडकोशी चर्चा करून सोडविणार ः लोकनेते रामशेठ ठाकूर

नामदेववाडीतील नागरिकांचा प्रश्‍न सिडकोशी चर्चा करून सोडविणार ः लोकनेते रामशेठ ठाकूर


पनवेल, दि.1 (वार्ताहर) ः वडघर ग्रामपंचायत हद्दीतील नामदेववाडी येथील जागा व राहती घरी सिडकोने पुनर्वसन योजनेंतर्गत संपादीत केलेली आहे. परंतु तेथील रहिवाशांचा काही प्रश्‍न उरला आहे. या संदर्भात स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली त्या भागातील रहिवाशी भेटीस येवून त्यांनी त्यांची समस्या मांडली आहे. या समस्येवर सिडकोशी चर्चा करून योग्य मार्ग काढू असे ठोस आश्‍वासन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या शिष्टमंडळाला दिले आहे.

या ठिकाणी राहणारे नरेश म्हस्के, बाळाराम भोईर, जयश्री पाटोळे, निर्मला गायकवाड, विजू सांबर, कर्सन वाळू आदींसह इतरांची घरे सिडकोने संपादीत करून निष्कासित केली आहेत. त्याबद्दल सिडको त्यांना विकसित प्लॉट देणार आहे. परंतु सहा महिने उलटून गेले तरी सिडकोने त्यांना विकसित भूखंड दिलेला नाही. त्यामुळे या कुटुंबांना अद्यापही भाड्याच्या घरात रहावे लागत आहे. ही सर्व जण गरीब कुटुंबातील असल्याने वाढत्या महागाईत त्यांना घर भाड्याचा खर्च परवडत नाही आहे. या संदर्भात त्यांनी महेश साळुंखे यांची भेट घेवून त्यांच्यासमोर आपली कैफियत मांडली असता महेश साळुंखे यांनी त्वरित मा.खा.लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासोबत बैठक लावू त्यांना या नागरिकांच्या समस्या सांगितल्या व यातून सकारात्मक मार्ग काढण्याची विनंती केली. या सर्व बाबीची माहिती घेवून लवकरच सिडको या संबंधित अधिकार्‍यांशी बोलून चर्चा करून हा प्रश्‍न निकाली काढू असे ठोस आश्‍वासन यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिल्याने येथील रहिवाशांनी त्यांचे आभार मानले आहेत.