देशाच्या प्रगतीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची नितांत आवश्यकता – श्री. राजरत्न आंबेडकर

 देशाच्या प्रगतीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची नितांत आवश्यकता – श्री. राजरत्न आंबेडकर



देशाच्या प्रगती आणि उन्नतीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर मार्गक्रमण करण्याची नितांत आवश्यकता आहे”, असे प्रतिपादन श्री. राजरत्न आंबेडकर, सचिव, वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट यांनी केले. सिडको बी. सी. एम्प्लॉईज असोसिएशनकडून डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 131 व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. 

या प्रसंगी डॉ. कैलास शिंदे, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, डॉ शशिकांत महावरकर, पोलीस उपमहानिरीक्षक तथा मुख्य दक्षता अधिकारी, सिडको, श्री. फैयाज खान, व्यवस्थापक (कार्मिक), श्री. विनोद पाटील, अध्यक्ष, सिडको एम्प्लॉईज असोसिएशन, श्री. नरेंद्र हिरे, अध्यक्ष, सिडको बी. सी. एम्प्लॉईज असोसिएशन, श्री. नितीन कांबळे, सरचिटणीस, सिडको बी. सी. एम्प्लॉईज असोसिएशन यांसह सिडकोतील विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. 

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. तसेच उपस्थित मान्यवरांना वैचारिक रोपटे आणि मधू कांबळे लिखित “समतेचा करार” हे पुस्तक भेट देण्यात आले.  

या प्रसंगी बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील विविध प्रेरणादायी घटना आणि प्रसंगांचे कथन करत श्री. राजरत्न आंबेडकर यांनी डॉ. आंबेडकरांनी निर्मिलेले संविधान हे विविधता असलेल्या भारतासारख्या देशातील नागरिकांना एकत्र ठेवण्याचे काम करत आहे असे सांगितले. सध्याच्या काळातील नगर नियोजन, मध्यवर्ती बॅंक, उर्जा व जल नियोजन या संकल्पनांचे मूळ हे डॉ. आंबेडकरांनी मांडलेल्या विचारांमध्ये किंवा त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये असल्याची माहितीही श्री. राजरत्न आंबेडकर यांनी यावेळी दिली. 

डॉ. कैलास शिंदे यांनी या प्रसंगी बोलताना समाजाच्या सर्व घटकांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरी मानवंदना ठरेल, असे मत व्यक्त केले. तसेच त्यांनी सिडको बी. सी. एम्प्लॉईज असोसिएशन राबवित असलेल्या सामाजिक उपक्रमांची प्रशंसाही केली. 

डॉ. शशिकांत महावरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महापुरुषांची शिकवण आचरणात आणणे महत्त्वाचे असल्याचे सांगत सिडको बी. सी. एम्प्लॉईज असोसिएशनकडून सन्मानित करण्यात आलेल्या मान्यवरांचे अभिनंदन केले. 

मागील सुमारे तीन दशकांपासून सिडको बी. सी. एम्प्लॉईजकडून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात येते व डॉ. आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींना आणि कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात येते. तसेच समाजपयोगी उपक्रमही राबविण्यात येतात. या वर्षी श्री. अश्विन मुद्गल, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, डॉ. बी. एस. बावस्कर, मुख्य आरोग्य अधिकारी, सिडको व त्यांचे आरोग्य विभागातील सहकारी, डॉ. एल. एस. शेख, सांख्यिकी विभाग प्रमुख, सिडको, श्री. अविनाश शाबादे, परिवहन अभियंता, सिडको, श्री. विजय राणे, मुख्य अग्निशमन अधिकारी, श्रीमती मिनाक्षीताई तांडेल, साहित्यिक व माजी सिडको कर्मचारी, श्री. विकास महाडिक, ज्येष्ठ पत्रकार (लोकसत्ता), श्री. दिलीप वैद्य, लेखापाल, सिडको आणि श्री. संतोष ठाकूर, लेखा सहाय्यक, सिडको यांना सन्मानित करण्यात आले. या वर्षी सामाजिक उपक्रमांतर्गत पनवेल तालुक्यातील तीन आदिवासी पाड्यांमध्ये कूपनलिकेची (बोअरवेल) व्यवस्था करण्याचे काम करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. नितीन कांबळे यांनी, सूत्रसंचालन श्रीमती माधुरी माणिककुवर तर आभारप्रदर्शन श्री. सुधीर कोळी यांनी केले.