विवाह नोंदणी ऑनलाईन पध्दतीने करता येणार-पनवेल महानगरपालिकेची तंत्रस्नेही वाटचाल
पनवेल,दि.३१ : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील चारही प्रभागातील नागरिकांना १एप्रिल पासून ऑनलाईन पध्दतीने विवाह नोंदणी करता येणार आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने 'मॅरेज रजिस्ट्रेशन पोर्टल' सुरु करण्यात आले आहे. नुकतेच या पोर्टलचे ट्रेनिंग अ,ब, क, ड या चार प्रभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांना देण्यात आले.
आयुक्त श्री गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बदलत्या काळाप्रमाणे महापालिकाही दिवसेंदिवस अधिक तंत्रस्नेही होत आहे. ऑनलाईन मालमत्ता कर भरण्यासाठी 'PMC TAX APP' आणि क्यू आर कोड ची सोय महापालिकेने केल्यानंतर आता नागरिकांना १ एप्रिल पासून विवाह नोंदणी ऑनलाईन पध्दतीने करता येणार आहे. यासाठी महापालिकेने 'मॅरेज रजिस्ट्रेशन पोर्टल'सुरु केले आहे. नोंदणी इच्छुक नागरिकांनी या लिंकवरती जाऊनhttp://pmc.marriagepermission.com आपली सर्व माहीती भरावयाची आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून या माहीतीची छाननी केली जाईल. दर सोमवारी आणि गुरुवारी १०-१२ यावेळेत या नोंदणी इच्छुक नागरिकांना बोलण्यात येईल.
दिलेल्या तारखेस येताना नागरिकांनी आपल्या मूळ कागदपत्रांचा छायांकीत प्रत असलेला एक सेट सोबत घेऊन यावे. त्याचवेळी त्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येईल. महापालिकेच्या मुख्यालय सोडून खारघर'अ',कळंबोली 'ब',कामोठे'क',पनवेल'ड' या प्रभाग कार्यालयात नागरिकांसाठी ही विशेष सुविधा देण्यात आली आहे.
कोट
तंत्रज्ञानाच्या युगात नागरिकांना विवाह नोंदणी करणे सोपे जावे यासाठी महापालिकेने पुढचे पाऊल उचलले आहे. यापुढे नागरिकांना विवाह नोंदणी करता महापालिकेच्या मुख्यालयात ये-जा करावी लागणार नाही.महापालिकेच्या प्रभाग कार्यालयात नागरिकांना १ एप्रिल पासून विवाह नोंदणी ऑनलाईन पध्दतीने करता येणार आहे.
श्री.गणेश देशमुख,आयुक्त पनवेल महानगलपालिका