आयपीएल स्पर्धेसाठी यजमान शहर म्हणून नवी मुंबई सज्ज


                                                                       

 आयपीएल स्पर्धेसाठी यजमान शहर म्हणून नवी मुंबई सज्ज




 

नवी मुंबई (प्रतिनिधी)-27 मार्च ते 18 मे या कालावधीत नवी मुंबईतील डि.वाय.पाटील स्टेडीयम मध्ये इंडियन प्रिमियर लीग अर्थात आयपीएलचे 20 सामने खेळविण्यात येणार असून या निमित्ताने जगभरातील नामांकित क्रिकेटपटू व क्रीडा रसिक नवी मुंबई शहरामध्ये येणार आहेत. त्यामुळे यजमान शहर म्हणून नवी मुंबईचा आधुनिक शहर म्हणून असलेला नावलौकीक प्रदर्शित व्हावा यादृष्टीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी आयपीएलच्या अनुषंगाने करावयाच्या कामांचे नियोजन करण्यासाठी क्रीडा विभाग व संबंधित विभागांची आढावा बैठक घेतली.

      याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, शहर अभियंता श्री. संजय देसाई, क्रीडा विभागाचे उपआयुक्त श्री. मनोजकुमार महाले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, उद्यान विभागाचे उपआयुक्त श्री. जयदीप पवार, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, परिवहन व्यवस्थापक श्री. योगेश कडुसकर, अतिरिक्त शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड व इतर अधिकारी उपस्थित होते.

      नवी मुंबईत होणा-या आयपीएलच्या 20 सामन्यांपैकी 16 सामने हे प्रकाश झोतात खेळविले जाणार असून त्या अनुषंगाने प्रामुख्याने वाहन पार्कींग व्यवस्थेकडे पोलीस विभागाच्या सहकार्याने विशेष लक्ष देण्याचे आयुक्तांनी सूचित केले. स्टेडियमच्या एकूण क्षमतेच्या 25 टक्के प्रेक्षकांना प्रत्यक्ष स्टेडियमध्ये बसून हे सामने पाहता येणार असल्याने किमान 5 हजार गाड्यांच्या पार्कींगचे नियोजन करावे असे निर्देश आयुक्तांनी दिले. पार्कींग क्षेत्राच्या जवळ प्रसाधनगृहांची व्यवस्था करण्याच्याही सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या. पार्कींगच्या ठिकाणी सुयोग्य विद्युत व्यवस्था राहील याची दक्षता घ्यावी आणि सदर परिसर सामने झाल्यानंतर त्वरित पूर्ण स्वच्छ होईल याकडेही काटेकोर लक्ष देण्याचे निर्देशित करण्यात आले.

      स्टेडियमपासून जवळ वेगवेगळ्या ठिकाणी वाहतुक पोलीसांच्या मदतीने वाहन पार्कींगचे नियोजन करून पार्कींग क्षेत्रापासून स्टेडियमपर्यंत येण्यासाठी क्रीडा रसिकांना तिकीट काढून एनएमएमटी बस सुविधा उपलब्ध करून देणेबाबत आयुक्तांनी निर्देश दिले.      पार्कींगच्या निश्चित करण्यात आलेल्या जागांची माहिती सामने पाहण्यासाठी येणा-या क्रीडा रसिकांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध माध्यमांतून व्यापक प्रसिध्दी करावी असेही निर्देश आयुक्तांनी दिले.

      साधारणत: पावणेदोन महिने सामन्यांचा कालावधी असल्याने पार्कींग क्षेत्रातील मार्कींग तशाप्रकारे करावे असेही सूचित करण्यात आले. पार्कींग क्षेत्राचे दिशा दर्शक फलकही सहजपणे नजरेस पडतील व ठळकपणे प्रदर्शित होतील अशाप्रकारे लावण्याच्या सूचनाही आयुक्तांनी केल्या.

      या संपूर्ण व्यवस्थेसाठी आयपीएल आयोजक समुहाकडून समन्वयक नियुक्त करण्याबाबत संबंधितांना सूचित करण्यात यावे असे निर्देशित करीत आयुक्तांनी गर्दीचे नियोजन करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात तसेच आरोग्य व अग्निशमन या दोन्ही यंत्रणांनी सुसज्ज रहावे असे आदेशीत केले.

      स्वच्छ व सुंदर शहर हा नवी मुंबईचा नावलौकीक असून नुकत्याच झालेल्या आशियाई महिला फुटबॉल चषक आंतरराष्ट्रीय स्पर्धेनंतर लगेचच आयपीएलचे सामने नवी मुंबईत होत असून हा शहरासाठी सन्मान आहे. त्यामुळे क्रिकेट सारख्या सर्वाधिक लोकप्रिय खेळ बघण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन जागतिक किर्तीचे खेळाडू व क्रीडा रसिकांचे स्वागत करताना त्यांच्या नजरेत शहराची प्रतिमा उंचावेल अशाप्रकारे नियोजन करण्याकडे काटेकोर लक्ष द्यावे असे निर्देश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दिले. 

Popular posts
आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने सिडकोच्या "माझ्या पसंतीचे घर" योजनेतील हजारो नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न!
Image
कळंबोली वहातुक शाखेकडून वाहन चालकांचे प्रबोधन
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेतेपदी बबनदादा पाटील यांची नियुक्ती होताच शिवसैनिकांमध्ये उत्साह
Image
खारघर सेक्टर २० शहा किंग्डम येथील बांधकाम व्यावसायिकाकडून होत असलेल्या वायु व ध्वनी प्रदूषणापासून नागरिकांची सुटका करावी-सौ.नेत्रा पाटील
Image
गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या खांद्याच्या वेदनेपासून तिला मिळाला आराम;खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये ६५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार - दुर्बीणीद्वारे केली खांद्यांवर शस्त्रक्रिया
Image