दोन वर्षे जनसेवेची.. महाविकास आघाडीची..!शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लोककलांच्या माध्यमातून गावोगावी जागरास सुरूवात
अलिबाग, दि.09 (जिमाका):- गेल्या दोन वर्षात राज्यात राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व रायगड जिल्हा माहिती कार्यालयातर्फे आजपासून जिल्ह्यात शासनाच्या जन कल्याणकारी योजनांचा लोककलांच्या माध्यमातून जागरास प्रारंभ झाला.
लोकांसाठीच्या योजना सोप्या आणि लोकांच्या भाषेत सांगितल्या की, त्या लोकांपर्यंत लवकर पोहोचतात. यासाठी शासनातर्फे लोककलापथकांच्या माध्यमातून शासकीय योजनांचा जागर हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
जिल्ह्यात आजपासून अरुणोदय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था, म्हसळा या संस्थेने तहसील कार्यालय म्हसळा 05:15 वा., प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यांनी अलिबाग बस स्थानक येथे 05.00 वा., तहसील कार्यालय अलिबाग 06:15 वाजता आणि स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था, रोहा यांनी 05.00 वाजता नागडोंगरी, अलिबाग या ठिकाणी लोककलेच्या या जागर कार्यक्रमास प्रारंभ केला. जिल्ह्यात विविध ठिकाणी दि.17 मार्च 2022 पर्यंत हा जागर असाच उत्साहात सुरू राहणार आहे.
आज सादर झालेल्या विविध कार्यक्रमांमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, अलिबाग तहसिलदार मीनल दळवी, नायब तहसिलदार मानसी पाटील, निवासी नायब तहसिलदार अजित तोळकर, चेंढरे ग्रामपंचायत उपसरपंच प्रणिता म्हात्रे आदी मान्यवरांनी आपली विशेष उपस्थिती नोंदविली.
विविध शासकीय योजनांच्या, जिल्ह्यात वैशिष्ट्यपूर्ण योजनांच्या झालेल्या फलनिष्पतींच्या माहितीचा यात समावेश आहे. आजपासून प्रारंभ झालेल्या या लोककला जागराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाकडून करण्यात आले आहे.