सुंदरा पनवेलकरांच्या मनात भरली

सुंदरा पनवेलकरांच्या मनात भरली


पनवेल / शंकर वायदंडे :-

 सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, चतुरस्त्र अभिनेते संतोष पवार यांचे नवे कोरे नाटक ' सुंदरा मनात भरली'  याचा रविवार दि 13 फेब्रुवारी रोजी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात  प्रयोग नुकताच पार पडला. हास्य आणि विनोदाची मेजवानी असलेल्या या नाटकात स्वातंत्र्यपूर्व काळातील इंग्रज राजवटीतील अधिकारी वर्गाची मानसिकता आणि ७० वर्षानंतरच्या अधिकारी व राज्यकर्ते यांची मानसिकता यांची सुरेख सांगड घालण्यात आली आहे.  राजदरबारातील राजनर्तिकेशी लगट करणारे लेफ्टनंट, व्हाइसरॉय आणि जज यांच्यामुळे नोकरी गेलेल्या गुलाब बाई आणि गंगाराम  यांनी या त्रिकुटाला धडा शिकवण्यासाठी केलेला खटाटोप हे या नाटकाचे कथासूत्र आहे. 

'सुंदरा मनात भरली' या नाटकाच्या शीर्षकातच त्याचे कथाबीज दडलेले आहे.  सुंदरा या केंद्रबिंदूच्या भोवती फिरणाऱ्या या लोकनाट्याचे लेखन दिग्दर्शन संतोष पवार यांचे आहे विनोद , कोट्या आणि पंचेस ठासून भरलेल्या या नाटकात क्षणोक्षणी हास्यस्फोट आणि टाळ्यांचा कडकडाट होतो. कथा सूत्राला आणि विविध प्रसंगांना अनुरूप गाणी आणि नृत्य यांची केलेली पेरणी या नाटकाला वेगळी ऊर्जा देऊन जाते. या नाटकाचे संगीत ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की व गायन नंदेश उमप यांचे आहे. शीतल तळपदे यांची प्रकाश योजना , सुनिल देवळेकर यांचे नेपथ्य व केशभूषा मंगल केंकरे यांची आहे. 

ब्रिटीशांचा काळ आणि सध्याच्या राजकारणातील व्यंग यावर नेमके बोट ठेवून घेतलेले पंचेस , स्मृती बडदे (गुलाबबाई) आणि सुंदरा  (पहचान कौन )यांच्या नृत्याची अदाकारी,  विकास समुद्रे (राजा) आणि संतोष पवार (गंगाराम)  यांचा हास्य धुमाकूळ रामदास मुंजाळ (लेफ्टनंट)  प्रशांत शेटे (न्यायशास्त्री) , ऋषिकेश शिंदे (व्हॉईसरॉय) यांच्या मिस्किल व वैशिष्ठ्यपूर्ण लकबीच्या व्यक्तिरेखा यांचा सुरेख नाट्याविष्कार अनुभवाचा असेल तर 'सुंदरा मनात भरली' हा नाट्यानुभव घ्यायलाच हवा.  आपल्या जवळच्या नाट्यगृहात पहायला विसरू नका सुंदरा मनात भरली