महाड येथे उद्भवणाऱ्या पूर परिस्थिती नियंत्रण उपाययोजनांबाबत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी मंत्रालयात घेतला आढावा

 महाड येथे उद्भवणाऱ्या पूर परिस्थिती नियंत्रण उपाययोजनांबाबत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी मंत्रालयात घेतला आढावा



रायगड,दि.4(जिमाका): महाड पूर निवारण व उपाययोजनांबाबत सर्वंकष आढावा आज मंत्रालयात राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.

      यावेळी खासदार श्री. सुनील तटकरे, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, रायगड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे,  महाड शहर नगराध्यक्षा स्नेहल जगताप, अपर जिल्हाधिकारी श्री. अमोल यादव, हे बैठकीस उपस्थित होते.

       यावेळी राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु. आदिती तटकरे म्हणाल्या की, पूर निवारणासाठी करावयाच्या महत्त्वाच्या उपाययोजनांच्या कार्यवाहीसाठी सद्य:स्थितीमध्ये  सावित्री नदीच्या पाण्याची पातळी कमी असल्याचा काळ आहे. याबाबत प्रशासनामार्फत सर्व प्रकारे सकारात्मक कार्यवाही वेळोवेळी होत आहे. आजच्या बैठकीच्या आधारे सर्व संबंधित यंत्रणांच्या प्रगती कार्याचा नियमित आढावा विभागनिहाय बैठकीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. 

       त्या पुढे म्हणाल्या, कोकण रेल्वे संदर्भातील अहवाल आयआयटी मुंबईकडून दि. 12 फेब्रुवारी रोजी  तर राष्ट्रीय महामार्गासंदर्भातील अहवाल दि. 14 फेब्रुवारी रोजी प्राप्त होणार असून त्यानंतर पुढील दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याविषयीची कार्यवाही तात्काळ सुरू करण्यात येईल. 

   यावेळी खासदार सुनील तटकरे म्हणाले की, कोकण किनारपट्टीवरील रायगड जिल्ह्याला वेळोवेळी नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. अतिपर्जन्याच्या या प्रदेशात कायमस्वरुपी ठोस उपाययोजना होण्यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी समन्वयाने कालबद्ध अंमलबजावणी करावी, अशा सूचना दिल्या.

    जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा महाड पूरनियंत्रण उपाययोजनांसाठी सर्व आवश्यक तांत्रिक बाबींची पूर्तता प्राधान्याने करीत आहे. या उपाययोजनांशी संबंधित जलसंपदा विभाग, कोकण रेल्वे, सार्वजनिक बांधकाम विभागाला आवश्यक त्या तांत्रिक बाबतीत तातडीचे सहकार्य जिल्हा प्रशासन करीत आहे. नदीपात्रातील गाळ काढून ठेवण्यासाठी पर्यायी जागेची व्यवस्थाही रायगड जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आल्याचे तसेच तातडीने उद्यापासूनच दहा डंपर व दोन पोकलेन गाळ काढण्याच्या कामास सुरुवात केली जाणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी यावेळी सांगितले.

      याशिवाय, या परिसरात सीआरझेडमध्ये चार बेटे आहेत त्यापैकी एका बेटावर मगरींचे वास्तव्य आहे. याबाबत पर्यावरणीय परिणाम सर्वेक्षण पहाणीनंतर पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार आहे. 

      यावेळी पाटबंधारे विभागाने महाड परिसरातील नद्यांमधील गाळ काढण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध असल्याने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी कुठेही खंड पडणार नाही तसेच नाम संस्थेस सर्व प्रकारचे सहकार्य विभागाकडून केले जाईल, असे स्पष्ट केले. राष्ट्रीय महामार्गावरील जुना सावित्री पूल काढून टाकण्याविषयीची कार्यवाही देखील मार्चपूर्वी पूर्ण करण्यात येईल, असे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

       जुलै महिन्यात आलेल्या महापूरामुळे शहरातील महत्त्वाचा भाग पाण्याखाली होता. महाड तालुका कोकणातील सरासरी पर्जन्याहून अधिक पर्जन्यमान असलेला तालुका आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय मार्ग, कोकण रेल्वे आदींमुळे शहराची लोकसंख्या अलिकडच्या काळात मोठ्या संख्येने वाढत आहे. पावसाळ्यात सावित्री नदीच्या पाण्याची पातळी वाढून जीवित व वित्तहानी होऊ नये, भविष्यात अतिवृष्टी व पूरामुळे उद्भवणाऱ्या आपतकालीन परिस्थितीवर कायमस्वरुपी उपाययोजना करणे अनिवार्य आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी करावयाच्या तातडीच्या उपाययोजनांमध्ये नजीकच्या कालावधीत कोकण रेल्वेच्या पूल परिसरातील भराव काढणे, सावित्री नदीचा गाळ व नदीपात्रातील बेटे काढणे, लहान धरणे बांधणे व सावित्री नदीपात्रातील अडथळे दूर करणे आदी महत्त्वांच्या कामांचा आढावा संबंधित शासकीय यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत आज मंत्रालय येथे आयोजित बैठकीत घेण्यात आला. 

       यावेळी बैठकीत कोकण रेल्वेचे मुख्य अभियंता नागनाथ राव, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता (यांत्रिकी) एम. एस. जीवने, महाड प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसिलदार सुरेश काशिद सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे डॉ. बाबाजी मस्कारे, आयआयटी मुंबईचे प्रो. सुबीमल घोष व पूर नियंत्रण समितीचे सदस्य उपस्थित होते. 


Popular posts
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
पनवेल परिसरातील ओपन लॉनवरील विवाह समारंभाला आता पहिली पसंती; हटके लग्न सराई, ठरतेय मुख्य आकर्षक
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image
पनवेल मतदारसंघात महिला सक्षमीकरणाचा मोठा उपक्रम : ४ हजाराहून अधिक महिलांना मिळणार शिलाई व घरघंटी मशीन
Image