अलिबाग - विरार कॉरिडोरबाबत शेतकऱ्यांमध्ये झालेला संभ्रम दूर करणार - शिरीष घरत
शेतकऱ्यांची दिशाभूल करून नुकसानीत ढकलण्याचा डाव शिवसेनेने उधळला
मंगळवारी प्रांत कार्यालयात होणार शेतकऱ्यांसमवेत बैठक
पनवेल :गेल्या काही महिन्यांपासून अलिबाग - विरार कॉरिडोरबाबत शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवून त्यांना विरोध करायला भाग पाडणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा डाव आता शिवसेनेने हाणून पाडला आहे. एका बाजूला आम्ही जनतेसाठी आहोत असे सांगून प्रत्यक्षात त्यांच्या विकासाला विरोध करण्याचे काम येथील स्थानिक पदाधिकारी करीत आहेत, म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी शेतकऱ्यांच्या मनामध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी तत्काळ मिटिंगचे आयोजन करावे, अशा आशयाचे लेखी निवेदन पनवेलचे उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांना शुक्रवारी दिले. या निवेदनाची दखल घेवून उपविभागीय अधिकारी पनवेल यांनी मंगळवार दिनांक ०१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता शेतकऱ्यांसोबत बैठक आयोजित करून त्यांच्या मनातील संभ्रम दूर करणार असल्याचे सांगितले.
विरार - अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडोरसाठी महामार्ग तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर भारतीय जनता पार्टीने अनेक प्रकल्प रखडविण्यासाठी जंगजंग पछाडलेली आहे. त्यामुळे भाजपच्या स्वार्थी आणि दूट्टप्पी भूमिकेमुळे येथील स्थानिक शेतकऱ्यांचे मात्र नुकसान होत आहे. सदर प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या मनात भरवून दिलेल्या शंकांचे निरसन करून त्यांना योग्य न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून पनवेलचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देवून बैठक आयोजित केली. यावेळी जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी सांगितले की, येथील स्थानिक शेतकरी हा आमचा अभिमान आहे, आणि त्यांचे नुकसान आम्ही कदापी होवू देणार नाही.
शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते पुन्हा मैदानात उतरले. त्यांना आरामाची गरज होती, मात्र जन सेवेसाठी वाहून घेतलेल्या घरत यांनी स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राबविण्यात आलेल्या कार्यक्रमांना हजेरी लावली. यावेळी त्यांना इतकी दगदग झाली की त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया झालीय हेही ते विसरून गेले. मात्र त्यानंतर त्यांच्या पायाला दुखापत झाली. सध्या ते रुग्णालयात उपचार जरी घेत असले तरी तालुक्यातील नागरिकांच्या न्याय हक्कासाठी ते जीवाची पर्वा न करता काम करीत असल्याचे यानिमित्ताने पहावयास मिळाले. मात्र त्यांचे खंदे समर्थक पनवेल तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल यांनी त्यांच्या कामाचा भार आपल्या खांद्यावर उचलून तालुका शिवसेनामय करण्याचा निर्धार केला आहे. यावेळी तालुक्यातील एकही ग्रामस्थांवर, शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही आणि जर झाला तर शिवसेना पूर्ण ताकदीनिशी उभी असल्याची भावना योगेश तांडेल यांनी बोलून दाखविली. आज पनवेलचे उपविभागीय तथा दंडाधिकारी राहुल मुंडके, तहसीलदार विजय तळेकर यांना शिवसेनेतर्फे पनवेल तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल, नवीन पनवेल उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर भंडारी यांनी निवेदन दिले.