नवी मुंबई महानगरपालिका-
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त कायदेविषयक साहित्य व प्रसिध्द कवितांचे सादरीकरण
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारीवृंद यांच्या सहभागातून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महानगरपालिकेचे विधी अधिकारी श्री. अभय जाधव यांनी कायदा, साहित्य आणि कार्यालयीन कामकाजात मराठीचा वापर यावर अभ्यासपूर्ण संवाद साधला. 1789 च्या फ्रेंच राज्यक्रांतीपासून कायदा हा शब्द अस्तित्वात आल्याचे सांगत त्यांनी कायदे विषयक विविध बाबींवर माहिती दिली. कायद्याशी संबंधित पुस्तके तसेच विधीज्ञांनी लिहिलेल्या विविध विषयांवरील साहित्यावर त्यांनी विवेचन केले. कार्यालयीन कामकाजात मराठी भाषा वापरली पाहिजे यावर भर देत कार्यालयीन आचारसंहितेबाबतही श्री. अभय जाधव यांनी महत्वपूर्ण गोष्टी सांगितल्या.
अशाच प्रकारचा एक अभिनव उपक्रम काव्यांजली शिर्षकांतर्गत राबविण्यात आला. यामध्ये महापालिका अधिकारी, कर्मचारीवृंदानी आपल्या आवडत्या मराठी कवीच्या दर्जेदार कवितांचे वाचन केले. अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, उपमुख्य स्वच्छता अधिकारी श्री. प्रल्हाद खोसे, श्री. अरविंद उरसळ, श्रीम. सुरेखा वाडे, श्रीम. पुष्पांजली कर्वे, श्री. प्रकाश बागडे, श्री. वसंत निमसे, श्रीम. नयना महाजन, श्रीम. वनश्री चव्हाण, श्रीम. सुजाता औटी, श्री. देवेंद्र भगत, श्रीम. प्रतिक्षा कोरडे, श्रीम. प्रिती जाधव, श्रीम. शर्मिली दिघे, श्रीम. प्रतिक्षा पाटील, श्रीम. अपर्णा सुतार, श्री. पुरुषोत्तम घरत, श्रीम. दुर्गा लगसकर, श्री. गजानन चव्हाण व श्री. संदीप फुलारी यांनी मराठीतील नामांकित कवींच्या कवितांचे सादरीकरण करून काव्यमय वातावरण निर्मिती केली. या निमित्ताने अधिकारी, कर्मचारीवृंदाकडून काव्य वाचनाकरीता कविता निवडण्यासाठी विविध कवितांच्या पुस्तकांचे वाचन झाले व ग्रंथ चळवळीला गती मिळावी हा महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचा काव्यांजली उपक्रम आयोजनामागील उद्देश नामांकित कवींच्या कविता निवडीमुळे सार्थकी लागला.