भारतीय प्रजासत्ताक दिनी सुलेखनकार श्री. अच्युत पालव साकारणार 'स्वच्छतेचे अक्षररंग'

 


 

भारतीय प्रजासत्ताक दिनी सुलेखनकार श्री. अच्युत पालव साकारणार 'स्वच्छतेचे अक्षररंग'


 

      नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशाच प्रकारचा एक अभिनव उपक्रम भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त राबविण्यात येत असून स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत सुप्रसिध्द सुलेखनकार श्री. अच्युत पालव 'स्वच्छतेचे अक्षररंग' हा अक्षर सुलेखनाचा अविष्कार साकारणार आहेत.

      स्वच्छ सर्वेक्षण 2022 ला सामोरे जाताना नवी मुंबई महानगरपालिकेने लोकसहभागावर भर दिला असून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सातत्यपूर्ण आयोजन केले जात आहे. अशाच प्रकारे 14 नोव्हेंबर 2021 रोजी बाल दिनानिमित्त स्वच्छ चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या चित्रकला स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थी चित्रकार तसेच काही कला शिक्षक स्वच्छतेचे अक्षररंग या उपक्रमात श्री. अच्युत पालव यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी होणार आहेत.

      नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीमध्ये सकाळी 9 वाजता हा अक्षर लेखनाचा उपक्रम राबविला जाणार असून याव्दारे स्वच्छता संदेश प्रसारणाप्रमाणेच मराठी भाषेचा अक्षर सुलेखनातून आकर्षक अविष्कारही साकारला जाणार आहे.