पनवेलकरांचा पनवेलसाठी साकारतोय 'रंगरचना कलामंच'
पनवेल(प्रतिनिधी) जगणं आणि जगवण्यात खूप मोठा आंतरिक प्रवास आहे . जगता जगता जगवण्यातला आनंद घ्यायचा असेल तर जगवण्यातच जगणं आहे हे ज्याला समजलं तो खऱ्या अर्थाने जगतो.हेच आतलं जगणं जगवण्यासाठी आणि जागवण्यासाठी स्वतःबरोबर दुसऱ्याच जगणं सुदंर व्हावं, जगण्यातल्या रंगात जगता जगता अधिक सुदंर रंग भरता यावेत म्हणून पनवेल मधील कलाकारांनी एकत्र येऊन "रंगरचना कलामंच ' स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून पनवेलकरांच्या या संस्थेचे उदघाटन समारंभ शनिवार दिनांक २२ जानेवारी २०२२ रोजी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पनवेल महानगरपालिका सभागृह नेते परेश ठाकूर तसेच लेखक, गीतकार संजय पाटील यांच्या हस्ते सायंकाळी ०४ वाजता श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला सिने - नाट्य क्षेत्रातील लेखक, रंगभूषाकार, दिग्दर्शक, अभिनेते तसेच पनवेल मधील नाट्यकलाकार व कलारसिक उपस्थित राहणार आहेत.
संस्थेच्या माध्यमातून नाट्यलेखन, रंगभूषा, नेपथ्य, संगीत, प्रकाश योजना या नाटकाच्या अविभाज्य अंगाबरोबरच अभिनय शिबीर, बालनाट्य शिबीर, चित्रपट व मालिका मध्ये काम करण्याचे तंत्र या विषयी कलाकारांना मार्गदर्शन करण्याचा मानस असल्याचे संस्थेचे प्रमुख अभिनेते विजय पवार व अभिनेते सचिन पाडळकर यांनी सांगितले, ही संस्था जास्तीत जास्त कलाकारांना रंगमंच उपलब्ध करून देण्यासाठीच साकार केल्याचेही त्यांनी सांगितले. संस्थेच्या उदघाटन कार्यक्रमास नाट्यरसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.