विहिघरमध्ये विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन
पनवेल (प्रतिनिधी) तालुक्यातील विहिघर येथे नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच ०१ जानेवारीला साईबाबा मुर्ती स्थापना वर्धापनदिन सोहळा, श्री. सत्यनारायणाची महापूजा, तसेच चिपळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच मंगेश पंढरीनाथ फडके यांच्या वाढदिवस समारंभानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमांना अनेक अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार महेंद्र दळवी, आमदार शशिकांत शिंदे, आमदार महेंद्र थोरवे, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबन पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सकाळी ८ वाजता श्री साईबाबा मुर्ती स्थापना वर्धापनदिन व अभिषेक, दुपारी १२ ते सायंकाळी ०६ वाजेपर्यंत कुस्त्यांच्या दंगली, दुपारी ०२ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, सायंकाळी ०५ वाजता ह. भ. प. शंकर महाराज आंग्रे आणि मंडळींचा त्रिवेणी संगम हरिपाठ शिवकर यांचे हरिपाठ, सायंकाळी ०६ वाजता उपसरपंच मंगेश पंढरीनाथ फडके यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा होणार आहे. रात्री ०९ वाजता जय भवानी प्रासादिक भजन मंडळ वडगाव यांचे तर रात्री १०. १५ वाजता श्री डांगर्णेश्वर सांप्रदायीक वारकरी भजन मंडळ मोरबे यांचे वारकरी जोड भजन होणार आहे. कुस्त्यांच्या दंगलीत किताब पटकाविणाऱ्या कुस्तीपटूस २५ हजार रुपये व चार फूट गदा, द्वितीय क्रमांकास १५ हजार रुपये व ३ फूट गदा तर तृतीय क्रमांक १० हजार रुपये व अडीच फूट गदा देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य बैलगाडी रेस संघटनेचे अध्यक्ष तसेच माजी सरपंच पंढरीनाथ फडके आणि कुटुंबीयांनी केले आहे.