पनवेल मध्ये "थिएटर ऑफ रेलेवन्स" चे दोन दिवसीय वैचारिक नाट्य उत्सव विचारवर्धक ठरले !


पनवेल मध्ये "थिएटर ऑफ रेलेवन्स" चे दोन दिवसीय वैचारिक नाट्य उत्सव विचारवर्धक ठरले


पनवेल(प्रतिनिधी)-  मानवता, समता, न्याय, संविधान, शांती आणि लोककल्याणाची गाज  असणाऱ्या थिएटर ऑफ रेलेवन्स चे १८-१९ डिसेंबर २०२१ रोजी दोन दिवसीय वैचारिक नाट्यउत्सव पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात संपन्न झाले.या नाट्य उत्सवाचे पाहिले नाट्यपुष्प मंजुल भारद्वाज दिग्दर्शित नाटक "सम्राट अशोक" हे  18 डिसेंबरला सकाळी 11.30 वाजता प्रस्तुत झाले.

     कलिंग! कलिंग! कलिंग! अशी गर्जना करत  सम्राट अशोक नाटकातील 'अशोक' हे चरित्र रंगमंचावर अवतरीत होते. रंगचिंतक मंजुल भारद्वाज हे चरित्र धारण करत रंगमंचावर प्रवेश करतात त्यावेळी सम्राट अशोकाचा सत्ता आणि अहंकाराचा हुंकार गुंजतो.अहंकाराच्या अग्नीत स्वतःला तापवतांना कलिंग युद्धाने झालेल्या जखमांच्या जाणिवेने सम्राट अशोकच्या मनात माणुसकीची संवेदना जागृत होतात आणि अहंकार नष्ट होतो.आपल्या अहं ला सोडून स्व: ची ज्योत पेटवून विश्वाला तो पाहतो. अहिंसेच्या ठोस मातीवर उभं राहून पाण्यासारखं निर्मळ आणि सर्व समावेशक आकाशाचे स्वरूप धारण करत सम्राट अशोक युगांयुगे आपल्या समोर अशोक स्तंभ म्हणजे आपल्या देशाची ओळख म्हणून उभा राहतो.

      धनंजय कुमार यांच्या लेखणीतून साकार झालेल्या या नाटकाचे शब्द रंगभूमीच्या मातीत एकरूप होतात आणि तिथून मंजुल भारद्वाज यांच्या अभिनयाने अंकुरित होत अवकाशात झेप घेतात. मंजुल भारद्वाज साकारणारे सम्राट अशोक हे चरित्र केवळ या पंचेंद्रियांनाच नाही तर अमूर्त असणाऱ्या आपल्या सहाव्या इंद्रियाला ज्याला आपण आत्मा, जाणीव, मन या शब्दात मांडतो या माध्यमातून जगासमोर अद्भुत परिवर्तनाचा प्रवास मांडते.

     भारतीय संविधान !संविधान म्हणजे सम - विधान ज्याने भारतातील प्रत्येकाला संवैधानिक समान अधिकार दिला. या संविधानाला एक नागरिक, एक माणुस म्हणून पाहण्याची दृष्टी नाटक "सम्राट अशोक" हे देते. 

रंगचिंतक मंजुल भारद्वाज अभिनित दिग्दर्शित

धनंजय कुमार यांच्या कालजयी नाट्यरचनेला आपल्या कलात्मकतेने साकारणार आहेत,अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, सुरेखा साळुंखे हे  !


दुसरे नाट्यपुष्प मंजुल भारद्वाज लिखित-दिग्दर्शित नाटक "लोक-शास्त्र सावित्री" 

सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आपण नेहमीच भरभरून बोलतो,परंतु हे नाटक सावित्रीला वर्तमानाशी जोडतं. ते आपल्याला स्वतःतील सावित्री शोधायला प्रेरित करतं. सावित्री म्हणजे विचार! प्रत्येक व्यक्तीच्या मनात सावित्री जागी होते पण व्यवहाराच्या प्रहाराने ती लोप पावते. प्रत्येकाच्या मनाततील सावित्रीला चिन्हीत करण्यासाठी  हे नाटक पुढाकार घेते.

वर्णवाद , धर्मशास्त्र, ब्राह्मणवाद, जातीव्यवस्था, लिंगभेदावर आधारित सामाजिक व्यवस्थेला आव्हान देत 'माणूस' म्हणून जगण्याला त्यांनी प्रोत्साहन दिले. याच बिंदू वरून मंजुल यांचे नाटक आकार घेते. नाटक 'माणूस' असण्याचा हुंकार देते.नाटकाची सुरुवात गाण्याने होते "वैदेही झाली, द्रौपदी झाली, झाशीची राणी झाली, परंतु आता मला सावित्री व्हायचे आहे." माझ्यामध्ये बहिणाबाईला जागवायचे आहे. सावित्रीबाईला जागवायचे आहे.'मानवते' चा एल्गार आहे "लोक-शास्त्र सावित्री" नाटक.ज्यामध्ये महिलांना 'माणूस' म्हणून जगायचे आहे. भारतीय संविधानाने त्यांना समानतेचा अधिकार दिला आहे.

       नाटकाचा मुख्य स्वर आक्रोशाचा आहे, निषेधाचा आहे. हा आक्रोश व निषेध पितृसत्तेच्या विरोधात आहे. ज्याने स्त्रियांना दुय्यम दर्जा दिला. स्त्रीच्या मानवी रूपाचा उदय होऊ दिला नाही.स्त्री शरीरात अवतार होताच, ती आई, बहीण, काकू, मावशी,मामी,आत्या, आजी, पत्नी,नणंद अशी  विशेषणं मिळवते, परंतु त्यात स्त्रीचे "स्व" कुठे राहतं.

100 मिनिटांच्या या नाटकात तीन स्तरांतील (वर्गातील) महिला आहेत. 

          पहिली निम्न वर्गातील घरगुती कामगार महिला. सायली पावसकर हिने ती जबरदस्त वठवली आहे. तिने 'घरोघरी' झाडू, लादी, भांडी साफ करून आर्थिक स्वातंत्र्य मिळवले आहे. पण त्या आर्थिक कमाईवर तिचा अधिकार नाही. दुसरी महिला मध्यमवर्गीय शिक्षिका आहे.कोमल खामकर यांनी मध्यमवर्गीय महिलेची भूमिका उत्तम साकारली. तिच्या चरित्रात एकीकडे शिक्षण, नोकरी, जीवन मूल्ये बदलण्याची परिस्थिती आहे आणि दुसरीकडे पारंपारिक संस्कार आहेत. तथाकथित पुरुष क्षेत्रामध्ये वेगाने तिचा वाटा तर वाढत गेला परंतु अर्थसत्ता असूनही पितृसत्ताक वर्चस्वामुळे निर्णय घेण्याच्या अधिकारापासून ती वंचित राहिली. स्वतःच्या मर्यादा तिला स्वतःला ओलांडाव्या लागणार , तिला विचार करावा लागणार, तेव्हाच ती स्वत: ला 'मानवी' रूपात स्थापित करू शकणार. या नाटकाची तिसरी नायिका "अभिनेत्री" असून ती अश्विनी नांदेडकर यांनी अतिशय ओजस्वी स्वरूपात साकारली आहे. जी स्वतः स्वतंत्र आहे. 'मानवी रूपात स्वतःचे अस्तित्व प्राप्त झालेली आहे. ती या दोन्ही स्त्रियांना समजावून सांगते की पितृसत्तात्मक व्यवस्था ही सामाजिक संरचना आणि चालीरितींची अशी एक प्रणाली आहे ज्या अंतर्गत पुरुष स्त्रियांवर आपले वर्चस्व, अत्याचार, शोषण आणि नियंत्रण ठेवतात.ती सांगते की महिलेला स्वचेतना जागृत करावी लागेल. स्वत: चे अस्तित्व शोधावे लागेल. तरच तिला 'माणूस' म्हणून स्वीकारले जाईल.

        स्त्रीचा आत्म-विकास आणि आत्मविश्वास जागृत करून व्यक्तिमत्त्व घडविण्याचे उद्दीष्ट घेऊन ही 'अभिनेत्री' समोर येते. आपल्या आतल्या सावित्रीला जागृत करण्याचे आव्हान ती करते (म्हणजेच 'माणूस' म्हणून जगणे) . तरच आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा मार्ग सापडेल. 

     नाटकाच्या शेवटी नाटकाचे सर्व कलाकार साक्षी खामकर, प्रियांका कांबळे, तुषार म्हस्के, नृपाली जोशी, सुरेखा साळुंखे आणि संध्या बाविस्कर समूह स्वरूपात ताकदीने उदयास येतात. हा समूह भारतीय समाजातील आहे. ज्यात पुरुष आणि स्त्रिया दोघेही आहेत, जे लैंगिक समानतेबद्दल बोलतात. जे स्वत: मध्ये सावित्री जागवा असे आवाहन करतात. सावित्री सर्वांपर्यंत पोहोचली आहे. आता इथून आम्ही बाहेर पडू ते माणूस म्हणून जगण्यासाठीच.

       पनवेलकर प्रेक्षकांच्या सर्जनशील सहभागाने हा दोन दिवसीय वैचारिक नाट्य महोत्सव संपन्न झाला. प्रत्येक प्रेक्षकाने संविधान संरक्षणासाठी व मनुष्य म्हणून जगण्याची प्रतिज्ञा घेतली!

Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image