पनवेल महापालिका निवडणुकिसाठी महाविकास आघाडी सज्ज, भाजपला निवडणुकांचे आव्हान
पनवेल महापालिकेसह रायगड जिल्ह्यातील निवडणुकांमध्ये भाजप होणार चितपत
महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मेळाव्यात एल्गार
पनवेल(प्रतिनिधी)-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून नागरिकांची कामे होऊ शकत असल्यामुळे आता येणाऱ्या निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच घेतल्या जाणार असल्याचा ठराव महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये करण्यात आला असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. येणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना चारी मुंड्या चीत करण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्यावतीने घेण्यात आला असल्याची माहिती यावेळी शहरातील काळण समाज सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली.
पनवेल महानगरपालिका, उरण नगरपंचायत, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, अर्बन बँक आणि जिल्ह्यातील इतर संस्थांच्या निवडणुका लक्षात घेवून आता महाविकास आघाडीने रणशिंग फुंकले आहे. या सर्व निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्यावतीने सर्व नेतेमंडळी सह कार्यकर्त्यांमध्ये कोणतेही मतभेद न होता मनोमिलन व्हावे यासाठी पनवेलमध्ये महाविकास आघाडीच्यावतीने भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये एकत्रित लढणाऱ्या सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सलोखा वाढावा आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये केवळ भाजप हटवाचे लक्ष असावे, यासाठीच या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्यावतीने एकजुटीचे शक्तीप्रदर्शन करण्यात आले. "हम सब एक है" या भावनेने आघाडीतील सर्व घटक पक्षांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट केली. आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा पराभव करून पनवेल महापालिका भाजपच्या छाताडावर बसून घेऊ, आणि येथील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारचे फायदे नागरिकांच्या हितासाठी वापरू, असा निर्धार यावेळी महाविकास आघाडीच्यावतीने करण्यात आला.
कोट
महापालिकेचे काम चालु असताना मालमत्ता कराच्या अडचणी आहेत त्याचबरोबर पाण्याच्या अडचणी आहेत. शिवसेना सल्लागार बबन पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही काम करत आहोत. येत्या काही दिवसातच मालमत्ता करामध्ये जी 30% सवलत दिली होती ती 50% देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि तसा निर्णय आम्ही लवकरात लवकर आणू हा आम्हाला विश्वास आहे. आज महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक संख्या ही तरुणांची आहे, आज आम्ही पाचही पक्षाचे नेते येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोमाने कामाला सुरुवात करणार आहोत, आणि याचा निकाल येणाऱ्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळणार आहे.
- प्रितम म्हात्रे, विरोधी पक्षनेते, पनवेल महानगरपालिका
कोट
आजचा महाविकास आघाडीचा मेळावा हा कार्यकर्त्यांसाठी महत्वाचा मेळावा आहे, येणाऱ्या निवडणुकांमध्ये गेल्या दोन वर्षात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आम्ही जे काम पनवेल आणि उरण याठिकाणी केले आहे ते कार्यकर्त्यांना नागरिकांच्या लक्षात आणून देता आले पाहिजे, तसेच गेल्या दोन वर्षात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर नागरिकांच्या अडचणींवर मात करण्यासाठी या सरकारकडून प्रतिसाद मिळत सत्ताधारी भाजपच्या मुजोर नेत्यांनी नागरिकांना बळीचा बकरा बनविला आहे, या सर्व बाबी तमाम जनतेपर्यंत कार्यकर्त्यांकडून कशा पद्धतीने पोहोचल्या पाहिजे यासाठी आजचा हा मेळावा घेण्यात आला आहे. आतापर्यंत पनवेलचा काही विकास झालेला नसल्याने एकत्रितपणे आघाडीने निवडणुका लढवायच्या आहेत.
- बबनदादा पाटील,
अध्यक्ष, पनवेल - उरण महाविकास आघाडी
रायगड जिल्हा सल्लागार, शिवसेना
कोट
यापूर्वी महाविकास आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढलो, आता शिवसेनाही महाविकास आघाडीमध्ये आहे. ज्याप्रकारे जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये मतदारसंघ वाढतात तसेच महानगर पालिकेमध्ये होत आहे. मेरिटवर आम्ही काम करणार आहोत. आणि पनवेल महानगरपालिकांसह जिल्ह्यातील निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची ताकद दाखविणार आहोत.
- महेंद्र घरत, रायगड जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
कोट
आमचे मनोमिलन हेच विरोधकांच्या छातीत धडधड निर्माण होण्यासाठी पुरेसे आहे, पनवेल महानगरपालिका निवडणुकांमध्ये नागरिकांचे सर्वाधिक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही काम करीत आहोत. यामध्ये मालमत्ता कर असेल, आकृती बंध असेल, कंत्राटी कामगार असेल, सफाई कामगार असतील, अवजड वाहने, प्रदूषण असे अनेक प्रश्न आज पनवेलकरांना सतावत आहेत. मात्र महाविकास आघाडी नागरिकांच्या सोबत आहे आणि सोबतच राहणार हा उद्देश आमच्या कार्यकर्त्यांसह आमचा नेतेमंडळींचा आहे. आणि हेच दाखविण्यासाठी आम्ही आजचा कार्यकर्त्यांचा मनोमिलन मेळावा आयोजित केला आहे. आणि असे मनोमिलन मेळावे हे येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक शहरांमध्ये होताना आपल्याला पहावयास मिळणार आहेत.
- सुदाम पाटील, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस