शस्त्रक्रिया न करता काढला ३ सेमी लांबीचा पित्तनलिकेतील खडा
७० वर्षीय रुग्णावर यशस्वी मिनिमली इन्वेसिव्ह स्पायग्लास कोलॅन्जिओस्कोपी - प्रगत एंडोस्कोपिक उपचारांनी पित्तनलिकेतील खडे काढून टाकण्यात डॅाक्टरांना यश
नवी मुंबई: खारघर येथील मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, यकृततज्ज्ञ आणि एंडोस्कोपिस्ट डॉ. रावसाहेब राठोड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ७० वर्षीय महिलेच्या पित्तनलिकेमध्ये अडकलेला ३ सेमीचा खडा काढून टाकण्यासाठी मिनिमली इनवेसिव्ह प्रक्रियेचा वापर केला. कावीळ झालेल्या या वयोवृध्द रुग्णाला यापूर्वी ईआरसीपी (एंडोस्कोपिक रेट्रोग्रेड कोलॅन्जिओपँक्रिएटोग्राफी) करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र ते प्रयत्न अयशस्वी ठरल्याने तिला पाहिजे तसा आराम मिळाला नाही. त्यानंतर रुग्णावर प्रगत एंडोस्कोपिक उपचार, स्पायग्लास कोलॅन्जिओस्कोपी करण्यात आली, ज्यामध्ये प्रक्रियेनंतर ती अवघ्या २४ तासांच्या आत पूर्णपणे बरी झाली.
पनवेल येथील राहणाऱ्या श्रीमती सुशीला चव्हाण या गेल्या दोन महिन्यांपासून तीव्र पोटदुखी आणि कावीळच्या समस्येशी झगडत होत्या. रुग्णाने यापुर्वी अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि दोनदा ईआरसीपी केले. मात्र तरीदेखील तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि ती तिची दैनंदिन कामे स्वतंत्रपणे करू शकत नव्हती. तिला दैनंदिन कामाकरिता कुटुंबातील सदस्यांची मदत घ्यावी लागत होती. पुढील उपचाराकरिता तिच्या कुटुंबियांनी रुग्णाला मेडिकव्हर रुग्णालयात नेले.
डॉ. रावसाहेब राठोड सांगतात की, जेव्हा रुग्ण आमच्याकडे उपचाराकरिता आला तेव्हा त्याला ताप आणि कावीळची लक्षणी दिसून आली. रक्त तपासणीत यकृताच्या कार्यामध्ये बिघाड झाल्याचे आढळून आले. तिच्या एमआरसीपीमध्ये सामान्य पित्त नलिकेत अडथळा निर्माण करणारा एक मोठा खडा दिसून आला. पित्त नलिकेत इतका मोठा खडा असणे दुर्मिळ आहे. पारंपारिक ईआरसीपी पध्दतीने तो खडा काढून टाकणे अशक्य होते, त्यामुळे शस्त्रक्रिया हा एकमेव पारंपारिक पर्याय राहिला. तथापि, अशा प्रकरणांमध्ये शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक असते, ज्यामध्ये रुग्णाला जास्त काळ रुग्णालयात राहावे लागते आणि गुंतागुंत होण्याचा धोका अधिक असतो, विशेषतः वयोवृद्ध रुग्णांना याचा धोका अधिक असतो. स्पायग्लास कोलॅन्जिओस्कोपी, एक अत्याधुनिक, किमान आक्रमक तंत्र वापरत पित्त नलिकेत लहान-कॅलिबर स्कोप काळजीपूर्वक वापरला. यात ३ सेमी आकाराचा खडा आढळला जो दिर्घकाळापासून त्या ठिकाणी अडकून राहिला होता. इलेक्ट्रोहायड्रॉलिक लेसर वापरून तो तोडण्यात आला आणि बलून कॅथेटरच्या मदतीने सर्व कचरा हळूवारपणे काढून टाकण्यात आला. पित्त नलिकाची संपूर्ण साफसफाई झाली आणि रुग्णाला फक्त एका दिवसात रुग्णाला स्थिर स्थितीत घरी सोडण्यात आले. जर योग्य वेळी उपचार केले नसते तर रुग्णाला सेप्सिस आणि सेप्टिक शॉक झाला असता. ही प्रक्रिया २ तास चालली आणि पुढील २४ तासांत रुग्णाला घरी सोडण्यात आले.
डॉ. रावसाहेब सांगतात की, स्पायग्लास कोलॅन्जिओस्कोपी ही मोठ्या पित्त किंवा स्वादुपिंडाच्या नलिकेत खडे आढळल्यास किंवा कोलॅन्जिओकार्सिनोमासारख्या आजारांचे निदान करण्याची आवश्यकता असल्यास फायदेशीर ठरते. या प्रकरणात, जिथे दोन ERCP अयशस्वी झाले आणि रुग्णाच्या वयामुळे शस्त्रक्रिया उच्च-जोखीम असण्याची शक्यता होती. हे प्रकरण प्रगत एंडोस्कोपिक तंत्रज्ञानाचे, विशेषतः वृद्ध आणि उच्च-जोखीम असलेल्या रुग्णांसाठी, परिणाम कसे बदलू शकते याची एक उत्तम उदाहरण ठरते.
दोन अयशस्वी प्रक्रियांनंतर मी आशा गमावली होती, परंतु डॉ. रावसाहेब आणि त्यांच्या टीमने मला जगण्याची आणखी एक संधी दिली असून मी त्यांचे आभार मानते अशी प्रतिक्रिया रुग्ण सुशीला चव्हाण यांनी व्यक्त केली.