गणेशोत्सवपूर्वी रस्त्यांची डागडुजी करावी-रिपाइं पनवेल शहर अध्यक्ष निलेश सोनावणे
पनवेल/ प्रतिनिधी
आगामी गणेशोत्सवपूर्वी पनवेल महानगर पालिका हद्दीतील सर्व रस्त्यांची डागडुजी करावी, रस्त्यांची अपूर्ण कामे पूर्ण करावीत अशी मागणी रिपाई पनवेल शहर अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी पनवेल महानगर पालिकेकडे केली आहे. पनवेल महानगर पालिका आयुक्त मंगेश चितळे उपायुक्त कैलास गावडे यांना याबाबत पनवेल रिपाई च्या वतीने निवेदन देण्यात आले.यावेळी पनवेल महानगर पालिका क्षेत्र अध्यक्ष प्रभाकर कांबळे, कामोठे शहर अध्यक्ष मंगेश धिवार, पनवेल युवा अध्यक्ष अक्षय अहिरे, गौतम पाटेकर, कामोठे वॉर्ड अध्यक्ष विक्रांत सुतार उपस्थित होते .
पनवेल महानगर पालिका क्षेत्रात रस्त्यांची दुर्दशा झाली आहे आगामी सणांच्या तोंडावर अशी परिस्थिती राहिल्यास ठीक ठिकाणी वाहतुक कोंडी, तसेच नागरिकांना मणक्याचे आजार होऊन आरोग्यावर परिणाम होत आहेत त्यामुळे सर्व रस्ते तातडीने दुरुस्त करावी असे मागणी करण्यात आली आहे
पनवेल महानगपालिका क्षेत्रातील रस्त्यांची अर्धवट कामे तातडीने पूर्ण करावीत.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या पडघे, ओवे, खारघर, तुर्भे, टेम्भोडे, पाले, देवीचा पाडा, नागडारी, धानसर, घोट, पेंधर, तळोजे मजकूर, रोहिंजन, वळवली, करवले आदी भागातील रस्ते, गटारे, नागरी सुविधांवर भर द्यावा.
पनवेल महानगर पालिकेच्या सामाजिक कल्याण, सामाजिक विकास विभागाकडून सर्व योजनांची अंमलबजावणी करावी. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची तसेच मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने अंतर्गत बौद्ध समाजातील पात्र व्यक्तींना भगवान गौतम बुद्धांचे जन्मस्थळ असलेले लुम्बिनी (नेपाळ) बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर अशा ठिकाणी दर्शनासाठी नेण्याच्या योजनेची अंमलबजावणी करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.