लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पनवेलमध्ये 'रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा'
शनिवारपासून पनवेलमध्ये दोन दिवस भजन पर्वणी; अंतिम फेरीसाठी भजन मंडळांची निवड
पनवेल (प्रतिनिधी) गोरगरिबांचे आधारवड, थोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने शनिवार दिनांक २३ ऑगस्ट आणि रविवार दिनांक २४ ऑगस्ट रोजी पनवेलमध्ये 'रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा' आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेसाठी पुरुष आणि महिला असे प्रत्येकी १५ भजन मंडळांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने भजन परंपरेला प्रोत्साहन देण्यासाठी या भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात पुरुष व महिला अशा दोन गटात हि स्पर्धा होणार असून या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक ५१ हजार रुपये, द्वितीय क्रमांक २५ हजार रुपये, तृतीय क्रमांकास १५ हजार रुपये, उत्तेजनार्थ पारितोषिक ७ हजार रुपये, तसेच उत्कृष्ट पखवाज वादक व उत्कृष्ट तबला वादक यांना प्रत्येकी ७ हजार रुपये आणि सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी पुरुष गटातून ३६ तर महिला गटातून ३० भजन मंडळांनी सहभाग घेतला होता. त्यामधून पुरुष गटातील अंतिम फेरीसाठी श्री सद्गुरू वामनबाबा प्रासादिक भजन मंडळ सिद्धी करवले, श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ खारघर, जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ वलप, श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ गव्हाण, सुरताल भजन मंडळ नारंगी, जय श्री राधे गोविंद भक्ती समूह कामोठे, शारदा संगीत भजन मंडळ विचुंबे, स्वरविहार भजन मंडळ अलिबाग, श्री स्वामी समर्थ भजन मंडळ अंजप, श्री सोमजाईदेवी प्रासादिक भजन मंडळ म्हसळा, श्रीराम वरदायिनी भजनी मंडळ उलवे, श्री सिद्धेश्वर प्रासादिक संगीत भजन मंडळ आवास, श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ वावंजे, गावदेवी प्रासादिक भजन मंडळ पेंधर, श्री गंगादेवी भजन मंडळ अलिबाग तर महिला गटात श्री पांडुरंग प्रासादिक भजन मंडळ खारघर गाव, आई एकविरा महिला भजन मंडळ दुन्द्रेपाडा, कुलस्वामिनी प्रासादिक भजन मंडळ ओवेपेठ, जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ वाजे, श्री सद्गुरू कृपा प्रासादिक महिला भजन मंडळ चिंचवली, कै. वैजयंती माता भजन मंडळ सावळे, सिद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळ तळोजे मजकूर, श्री विश्वविजयनाथ सुहास्य संगीत विद्यालय उरण, ओमसाई भजन मंडळ खरसुंडी, नवदुर्गा प्रासादिक भजन मंडळ कोपरा, शिरसाई प्रासादिक महिला भजन मंडळ कर्जत, श्रीपती बाबा प्रासादिक भजन मंडळ नेरुळ, जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ खोपोली, राधाकृष्ण प्रासादिक भजन मंडळ वावंजे, आणि ओंकार संगीत भजन मंडळ नेरळ अशा प्रत्येकी १५ अशा एकूण ३० भजन मंडळांची निवड झाली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून शनिवारपासून पनवेलमध्ये दोन दिवस भजन पर्वणी मिळणार आहे.