महाराष्ट्र दिनी सीईआर निधीतून नवी मुंबई महानगरपालिकेस आयकियामार्फत 2 सक्शन वाहने प्रदान
केंद्र सरकारच्या नमस्ते योजने अंतर्गत 230 सफाई मित्रांना पीपीई किटचे वाटप व प्रशस्तीपत्रे वितरण
आयकिया व कॅम्प फाऊंडेशन यांनी पुढाकार घेत व सामाजिक बांधिलकी जपत महानगरपालिकेच्या सुरक्षित स्वच्छता अभियानाला 2 सक्शन वाहने देऊन तसेच सफाई मित्रांना प्रशिक्षण देऊन जे योगदान दिले आहे त्या सहयोगी भूमिकेची महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी प्रशंसा केली. नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छताकर्मींचे जीवनमान उंचाविण्यासाठी व सर्व काळजी घेऊन त्यांना सुरक्षित काम करता यावे यादृष्टीने प्रशिक्षण देत असून हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणा-या कर्मचा-यांचे अभिनंदन आहे अशा शब्दात महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांनी प्रशस्तीपत्र देऊन अभिनंदन केले.
स्वच्छता क्षेत्रात कार्यरत कर्मचा-यांचे प्रशिक्षण घेऊन त्यांची क्षमता बांधणी करण्यात अग्रेसर असणा-या कॅम्प फाऊंडेशनच्या माध्यमातून आयकिया फर्निचर मॉलच्या सीईआर निधी अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेस 2 हजार लीटर क्षमतेची 2 सक्शन वाहने देण्यात आली असून त्याच्या प्रतिकात्मक चाव्यांचे हस्तांतरण महापालिका मुख्यालयात ध्वजारोहण समारंभानंतर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना आयकियाच्या वतीने उप भंडार व्यवस्थापक श्रीम.रुपाली सिंग यांनी केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. शरद पवार, शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता श्री. अरविंद शिंदे, अतिरिक्त शहर अभियंता श्री. संजय खताळ आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालय यांच्या नमस्ते योजनेच्या माध्यमातून (National Action for Mechaniased Sanitation Eco System) नवी मुंबई महानगरपालिकेकडे 230 पीपीई किटचे वितरण करण्यात आले. या किटमध्ये सेफ्टी गमबुट, ग्लोव्हज, नमस्ते डंगरी, सेफ्टी हेल्मेट, सेफ्टी गॉगल, एन 95 मास्क, हाफ फेस मास्क अशा साधनांचा समावेश असलेला पीपीई किटचे वितरण करण्यात आले.
त्यासोबतच कॅप्म फाउुंडेशनच्या सहयोगाने आयकियाच्या सौजन्याने सफाई मित्रांकरिता 15 दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ते प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणा-या सफाई मित्रांना प्रशस्तीपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले.