फेब्रुवारी महिन्यातील 4 सेवानिवृत्त नमुंमपा कर्मचा-यांना सन्मानपूर्वक निरोप
सेवानिवृत्तीकडे मनमोकळे आयुष्य जगण्याची एक संधी म्हणून बघावे असे सांगत अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी नवी मुंबई महानगरपालिका सेवेतून सेवानिवृत्त होणा-या 4 अधिकारी, कर्मचारी यांना पुढील आरोग्यपूर्ण जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
त्याचप्रमाणे अतिरिक्त आयुक्त श्री.विजयकुमार म्हसाळ यांनी याप्रसंगी बोलताना अनुभवी अधिकारी, कर्मचारी सेवेतून निवृत्त झाल्याने एकप्रकारे त्या संस्थेची कार्यालयीन हानी होते असे सांगत कामातील व्यस्ततेमुळे करायच्या राहून गेलेल्या आपल्या आवडत्या गोष्टी करण्यासाठी हा मिळालेला मोकळा वेळ सत्कारणी लावा असे आवाहन केले.
नवी मुंबई महानगरपालिका सेवेतून फेब्रुवारी 2024 महिन्याच्या अखेरच्या दिवशी सेवानिवृत्त होणारे वैदयकीय समाजसेवक श्री.युवराज बोरसे, शिक्षिका श्रीम. लतिका गवई, शस्त्रक्रियागृह सहाय्यक श्री. राजू गंगावणे व वाहनचालक श्री. अरुण भगत यांचा नमुंमपा मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात सेवानिवृत्तीनिमित्त विशेष सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम.सुजाता ढोले व श्री.विजयकुमार म्हसाळ, समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे, भांडार विभागाच्या उपआयुक्त श्रीम.मंगला माळवे, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, समाजविकास अधिकारी श्री. सर्जेराव परांडे, प्रशासकिय अधिकारी श्री. उत्तम खरात व श्री. विलास मलुष्टे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी सेवानिवृत्त होणा-या अधिकारी, कर्मचारी यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठया संख्येने उपस्थित असलेल्या नमुंमपा अधिकारी, कर्मचारीवृंदातून तसेच कर्मचा-यांच्या नातेवाईकांमधून काही जणांनी मनोगते व्यक्त करीत सदिच्छा दिल्या.