मराठा समाजातील पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याकरीता तहसील कार्यालय पनवेल यांचेमार्फत मोठया प्रमाणात शिबिरांचे आयोजन
नवीन पनवेल : अपर मुख्य सचिव, (महसूल) यांनी व जिल्हाधिकारी रायगड अलिबाग, यांनी दिलेल्या निर्देशानुसार पनवेल तालुक्यातील मराठा समाजातील सर्व पात्र व्यक्तींना कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबीचे जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याकरीता तहसीलदार पनवेल यांचेमार्फत संपुर्ण पनवेल तालुक्यामध्ये दिनांक २२ ते २४ जानेवारी २०२४ या कालावधीत मोठया प्रमाणात स्थानिक पातळीवर शिबिरे आयोजित करण्यात आलेली आहेत.
तहसीलदार पनवेल यांचेमार्फत तालुक्यातील सर्व मराठा समाज बांधवांना सदर शिबिरास शासन नियमानुसार जात प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्याकरीता सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहुन आपल्या हक्काचे जात प्रमाणपत्र प्राप्त करुन घेणेबाबत आवाहन करण्यात आलेले आहे. तसेच मराठा समाजातील एखादा व्यक्ती जात प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्याकरीता पात्र आहे, परंतु त्याच्याकडे जातीबाबतचा ठोस पुरावा नाही, अशा व्यक्तींकरीता पनवेल तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षात पुरावा शोधण्यासबंधी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व पात्र मराठा बांधवांनी सदर संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन पनवेलचे तहसीलदार विजय पाटील यांनी केले आहे.