पंडित उमेश चौधरी यांच्या शास्त्रीय गायनाचे आकाशवाहिनीवर होणार प्रसारण

 पंडित उमेश चौधरी यांच्या शास्त्रीय गायनाचे आकाशवाहिनीवर होणार प्रसारण 



पनवेल (प्रतिनिधी) २१ वर्षांच्या संगीत साधनेच्या कालावधीत आपल्या अथक साधनेने गायन कलेवर प्रभुत्व निर्माण करणारे पंडित उमेश चौधरी यांच्या शास्त्रीय गायनाचे नुकताच मुंबईत रेकॉर्डिंग झाले असून या कार्यक्रमाचे प्रसारण दिनांक १८ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता मुंबई अस्मिता आकाश वाहिनीवर होणार आहे. विशेष म्हणजे भूमिपुत्रापैकी ते पहिले गायक ठरले आहेत. 
            पनवेल तालुक्यातील रांजणपाडा येथील पंडित उमेश चौधरी यांना संगीत साधना करता करता समाजाने अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे पण त्यांनी कधीही कुठेही बडेजाव केला नाही.  अतिशय विनम्र, साधासरळ आणि इतरांना मदत करायला तत्पर असलेल्या आणि स्वरसाधनेत रमलेल्या या कलाकाराने तळागाळात संगीत सेवा वृंध्दीगत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरूच ठेवला आहे.  अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची 'संगीत विशारद' ही पदवी प्राप्त असलेले पंडित उमेश यांनी जयपूर अत्रौली घराण्याचे उस्ताद अस्लम खान यांच्याकडे तब्बल १० वर्ष शास्त्रीय संगीताची तालीम घेतली. त्यांनी शास्त्रीय संगीतातील बारकावे समजून घेत स्वतंत्र मैफली गाजवल्या. वारसा समर्थपणे चालविणारे पंडित उमेश यांनी आज स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या मैफलींनी दीडशेचा टप्पा पार केला असून साऱ्या भारतभर त्याचे कार्यक्रम झाले आहेत. त्या अनुषंगाने आकाशवाणीवर पंडित उमेश चौधरी यांचे शास्त्रीय गायनाचे पहिले रेकॉरडींग झाले. यावेळी त्यांचे रेकॉर्डिस्ट पं.चंद्रकांत वझेसर होते तर साथसंगत करीता तबल्यावर श्री.धामापूरकर तर हार्मोनियमवर श्री.फडकेसर होते.  राग अहीरभैरवातील बडा खयाल ”तेरो जिया सूख पावे” तर “मनुवा तू जागत रहीयो” हा छोटा खयाल गायला असून त्याचे त्याचे प्रसारण मुंबई अस्मिता आकाशवाहिनीवर होणार आहे. निश्चितच हे रायगड नवी मुंबईकरांसाठी अभिमानाची बाब आहे.