वाहनबंदी असलेल्या माथेरान हिलस्टेशनवर तब्बल 172 वर्षांनी पहिल्यांदाच ई रिक्षा सेवा सुरू
माथेरान (प्रतिनिधी)- वाहनबंदी असलेल्या माथेरान हिलस्टेशनवर तब्बल 172 वर्षांनी पहिल्यांदाच ई रिक्षा सेवा सुरू करण्यात आली आहे. आजपासून या ई रिक्षा सेवेचा प्रारंभ झाला आहे. भविष्यात माथेरानच्या पर्यटन वाढीमध्ये ई रिक्षाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
माथेरान गिरीस्थानाचा ब्रिटिशांनी 1850 साली शोध लावला. तेव्हापासून येथील पर्यावरणाचं नुकसान होऊ नये या हेतूने माथेरानमध्ये वाहनबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांना दस्तुरी पॉईंटच्या वाहन तळावर गाड्या लावून पुढे माथेरान गिरीस्थानापर्यंतचा तीन किलोमीटरचा प्रवास हा घोडा किंवा हाताने ओढाव्या लागणाऱ्या रिक्षाने करावा लागत होता. नेरळ माथेरान दरम्यान धावणारी मिनीट्रेन सुद्धा आतापर्यंत अनियमित होती. त्यात घोडा आणि हातरिक्षाचे दरही अनेकांना परवडणारे नसल्यामुळे बहुतांशी पर्यटकांना दस्तुरी पॉईंट ते माथेरान अशी तीन किलोमीटरची पायपीट करावी लागत होती. या सगळ्याचा माथेरानच्या पर्यटनाला मोठा फटका बसत होता. मात्र बदलत्या काळानुसार माथेरान गिरीस्थानावर पर्यावरणाचं नुकसान न करता ई रिक्षाला परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात येत होती. त्या मागणीचे फलित आजपासून ई रिक्षा सुरू झाली.