मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी केले जेरबंद

मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी केले जेरबंद


पनवेल, दि.17 (संजय कदम) ः पनवेल परिसरासह खांदेश्‍वर परिसरात मोटार सायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या दोघा सराईत गुन्हेगारांना खांदेश्‍वर पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून 4 गुन्हे उघडकीस आणले आहेत.

परिमंडळ 2 मधील नवीन पनवेल, पनवेल या भागांमधुन मागील बर्‍याच दिवसांपासुन मोटार सायकल व जबरीने सोन्याच्या चेन चोरीच्या घटना वारंवार घडत होत्या. मोटारवाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली होती. पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, सह पोलीस आयुक्त संजय येनपुरे, अति. पोलीस आयुक्त (गुन्हे) दिपक साकोरे, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-2 प्रशांत मोहीते, सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग, अशोक राजपुत यांनी वारंवार गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या मिटींग घेवुन मोटारवाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शक सुचना दिलेल्या होत्या. खांदेश्‍वर पोलीस ठाणे हद्दीत मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार खांदेश्‍वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती स्मिता ढाकणे, पोनि (गुन्हे) सचिन परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि सपोनि शरद बरकडे व सपोनि प्रतापराव बंडगर यांच्यासह पोहवा महेश कांबळे, भाऊराव बाचकर, धीरेंद्र पाटील, उदय देसाई, पोना मुबारक तडवी, पोशि सचिन सरगर, सचिन पवार, युवराज शिवगुंडे, रुषीकांत परदेशी, विकास कामनुरकर, संदीप तरटे आदींच्या पथकांनी सर्व मोटारसायकल चोरीच्या घटनास्थळांवरील तसेच पनवेल शहर पोलीस ठाण्याकडील चैन स्नॅचिंगच्या घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज एकत्रित करुन त्याचा सखोल अभ्यास करुन रेकॉर्डवरील आरोपी निष्पन्न केले. त्यानुसार पंचशील नगर झोपडपट्टी परिसरात सापळा लावुन आरोपी आकाश गोपाळ गाडे, वय-23 वर्षे विचुंबे, व सुरज मारूती देवरे, वय 22 वर्षे, नवीन पनवेल यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे कसुन विचारपुस केली असता, त्यांनी मोटारसायकल चोरी व चैन स्नॅचिंग करत असल्याचे कबुल केले. तसेच नमुद आरोपींनी चोरी केलेल्या गाड्या बेवारस स्थितीत सोडुन दिल्या असल्याचे सांगितले. नमुद आरोपींना अटक करुन त्यांच्याकडुन आतापर्यंत एकुण 3 मोटारसायकल व 30 ग्रॅम वजनाच्या 2 सोन्याच्या चैन असा एकुण किं. रु. 2,35,000/- चा मुद्देमाल हस्तगत करुन 4 गुन्हे उघडकीस आणण्यात खांदेश्‍वर पोलीसांना यश प्राप्त झाले आहे. अटक आरोपींकडे अद्याप तपास चालु आहे.


Popular posts