राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्थेमध्ये जागतिक दिव्यांग दिन दिमाखात साजरा
खारघर, नवी मुंबई येथील राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्था, प्रादेशिक केंद्र नवी मुंबई येथे दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी जागतिक दिव्यांग दिन अत्यंत उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. हा उपक्रम दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी, त्यांच्या हक्कांविषयी जनजागृतीसाठी आणि समावेशक समाजनिर्मितीसाठी महत्त्वपूर्ण ठरला.
हा कार्यक्रम संस्थेचे प्रभारी अधिकारी डॉ. रवी प्रकाश सिंह यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. त्यांच्या सततच्या मार्गदर्शनामुळे आणि नियोजनामुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून श्री तुकाराम मुंढे (IAS), सचिव – दिव्यांगजन कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन उपस्थित होते.याशिवाय कार्यक्रमास सन्माननीय अतिथी म्हणून-श्री योगेश देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी, हेलेन केलर इन्स्टिट्यूट ऑफ डेफ अँड डेफ-ब्लाइंड, श्री मंगेश पाटील, जिल्हा दिव्यांगजन सक्षमीकरण अधिकारी, अलिबाग, रायगड, सुश्री शिरीष पूजारे, स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठान, उपस्थित होते.तसेच विशेष अतिथी म्हणून —डॉ. अविनाश पडालकर, रेडिओलॉजिस्ट, सिव्हिल हॉस्पिटल, ठाणे, श्री अमरेन्द्र शाह, अध्यक्ष, रोटरी क्लब, खारघर, सुश्री अनुराधा बागची, संचालक, हेलेन केलर इन्स्टिट्यूट ऑफ डेफ अँड डेफ-ब्लाइंड, श्री जगन मुदगडे, प्रोजेक्ट हेड, द हन्स फाउंडेशन हे मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून श्री तुकाराम मुंढे (IAS), सचिव – दिव्यांगजन कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांनी आपल्या भाषणात दिव्यांग व्यक्तींकरिता शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपयुक्त योजना, अधिकार, सुविधा आणि नविन उपक्रमांची माहिती दिली. विशेषत: कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तक्रार निवारण व्यवस्था आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुधारित शिष्यवृत्ती योजनांविषयी त्यांनी पालकांना मार्गदर्शन केले. दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी शासन करीत असलेल्या प्रयत्नांची आणि येत्या काळात राबविण्यात येणाऱ्या योजनांची त्यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाचे महत्त्व अधिक वाढले.
कार्यक्रमाचा विशेष आकर्षण म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये बौद्धिक दिव्यांग मुले, त्यांचे पालक तसेच प्रशिक्षणार्थींनी नृत्य, गायन, नाटक इत्यादी विविध कलाप्रकारांची मनमोहक सादरीकरणे केली.हेलेन केलर इन्स्टिट्यूटच्या विशेष विद्यार्थ्यांनीही नृत्य, सांकेतिक भाषेत जन गण मनचे सादरीकरण करून सर्वांची मनं जिंकली.मुख्य अतिथी श्री तुकाराम मुंढे यांच्या हस्ते राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजान सशक्तीकरण संस्था नवी मुंबई आणि द हंस फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यन्वित असलेल्या प्रकल्पाअंतर्गत तिसऱ्या बसचे उदघाटन करण्यात आले. राष्ट्रीय बौद्धिक सशक्तीकरण संस्थेद्वारा विकसित “निपिड दिशा पुस्तके" आणि एसएलडी किटचे वाटप बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांना करण्यात आले. या उपक्रमांचा उद्देश दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबांना अधिक सक्षम करणे हा आहे.
कार्यक्रमादरम्यान, सर्व मान्यवर अतिथींनी त्यांच्या संस्थांकडून भविष्यात राष्ट्रीय संस्थेशी सहयोगाने राबविता येणारे उपक्रम, सेवा आणि सहकार्याचे आश्वासन दिले. संस्था प्रमुख डॉ. रवी प्रकाश सिंह यांनी संस्थेमध्ये राबविण्यात येणाऱ्या सेवांची माहिती दिली आणि 2025 च्या दिव्यांग दिनाच्या थीमनुसार समावेशकतेचे महत्त्व अधोरेखित केले.
या संपूर्ण कार्यक्रमामध्ये दिव्यांग मुले, त्यांचे पालक, प्रशिक्षणार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.


