पनवेल महापालिका क्षेत्रात आजपासून 'कुष्ठरोग शोध मोहीम-आशा सेविका व स्वयंसेवक देणार भेट
पनवेल,दि.16: पनवेल महापालिका क्षेत्रात १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत कुष्ठरोग शोध मोहीम अभियान राबविण्यात येणार असून २०२७ पर्यंत जिल्ह्यात कुष्ठरोग्याची संख्या शून्यावर आणण्यासाठी 'शून्य कुष्ठरुग्ण प्रसार' हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महापालिका प्रशासन काम करीत आहे. या मोहिमेदरम्यान आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरी भागातील जोखीमग्रस्त लोकसंख्येचे प्रत्यक्ष तपासणी करण्यात येणार आहे.
या मोहिमेंतर्गत आशा सेविका, परिचारिका , स्वयंसेवक घरोघरी जाऊन भेटी देणार असून लोकसंख्यंचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तरी या मोहिमेदरम्यान घरी येणाऱ्या पथकास नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.आनंद गोसावी यांनी केले आहे.
कुष्ठरोग हा मायक्रोबॅक्टेरियम लेप्रे नावाच्या जंतूमुळे होतो. या जंतूमुळे त्वचेवर व शरीराच्या नसा इतर अवयवावर परिणाम होतो. या मोहिमेदरम्यान शहरी भागातील 30टक्के जोखीमग्रस्त लोकसंख्येचे प्रत्यक्ष तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेत 3 लाख 3 हजार लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी पालिका क्षेत्रातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय विशेष पथकांतर्गत 203आशा सेविका व 43 पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे .नुकतेच यांना सर्वेक्षणासाठी प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती पालिकेच्या कुष्ठरोग अधिकारी डॉ.उषा राठोड यांनी दिली आहे.
चौकट
कुष्ठरोगाची लक्षणे
शरीराच्या कुठल्याही भागावर फिकट लालसर न खाजणारा बधीर चट्टा-डाग, त्या ठिकाणी धाम न येणे, जाड बधीर तेलकट त्वचा, त्वचेवर लहान लालसर गाठी असणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, त्वचेवर थंड व गरम संवेदना न जाणवणे, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्णपणे बंद करता न येणे, हातातून वस्तू गळून पडणे, चालताना पायातून चप्पल निसटणे, हाताची व पायाची बोटे वाकडे असणे, हात मानेपासून पाय घोट्यापासून लुळा पडणे.
