मानवता हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

 मानवता हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत 

महेंद्रशेठ घरत यांच्यातर्फे टी-शर्ट देणगी स्वरूपात



उरण दि ५(विठ्ठल ममताबादे )"महान संत साईबाबांनी आपल्याला श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र दिला. याच साईबाबांची पालखी श्री साई सेवा मंडळ उरण काढते. त्यांचे यंदा पालखीचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे, ही गौरवास्पद बाब आहे. त्यांचा आदर्श घेऊन उरण परिसरात शिर्डीला पालखी निघण्याची परंपरा सुरू झाली आहे. भर उन्हातून तरुण पायी शिर्डीला जातात, त्यांना सहकार्य करणे मी माझे कर्तव्य मानतो. मानवता हाच खरा धर्म आहे, असे मी मानतो आणि कृतीतून ते समाजात दाखवून देतो", असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी सोनारी येथे आपले मत व्यक्त केले.
"आई-वडिलांची सेवा करा, त्यांची सेवा केलीत तर आयुष्यात काहीही कमी पडणार नाही, मी सेवेचे व्रत हाती घेतले आणि सुखकर्ता बंगल्यावरून ते चोवीस तास चालते. वेगवेगळ्या सेवेचा यात समावेश आहे. त्यात खंड पडू देत नाही," असेही महेंद्रशेठ घरत यावेळी म्हणाले.
महेंद्रशेठ घरत यांच्यातर्फे शिर्डीला जाणाऱ्या तरुणांना टी-शर्ट देण्यात आले, गेल्या तीन वर्षांपासून टी-शर्ट देण्याचा उपक्रम महेंद्रशेठ घरत यांनी सुरू केला आहे.

यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अखलाख शिलोत्री, द्रोणागिरी स्पोर्ट असोसिएशनचे महादेव घरत, उद्योजक मंगेश तांडेल, माजी जिल्हा परिषद सदस्य तुकाराम कडू, मुरलीधर ठाकूर, लंकेश ठाकूर, भेंडखल उपसरपंच अजित ठाकूर, उरण तालुका युवक इंटक अध्यक्ष राजेंद्र भगत, उरण तालुका पर्यावरण अध्यक्ष अंगद ठाकूर, रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश ठाकूर, ग्राम सुधारणा मंडळ सोनारी उपाध्यक्ष प्रशांत कडू आणि मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. 
यावेळी अपोलो हास्पिटल, ग्रामसुधारणा मंडळ अध्यक्ष आणि ग्रामपंचायत सोनारीच्या वतीने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. टोपी आणि ओळखपत्र वाटपही यावेळी करण्यात आले.